चांदवड : भटिंडा पंजाब येथे २६८ इंजिनियर रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील लष्करातील जवान तेजस जयवंत आहेर (32) यांचे मनमाड जवळील नागापूर येथे दुचाकी अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.२३) रोजी वाहेगावसाळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देवळाली येथील लष्कराची तुकडी तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली.
तेजस हे नुकतेच सुट्टीवर आले होते. वाहेगावसाळ येथील त्यांचे काम आटोपून ते त्यांच्या शालकासोबत चाळीसगाव जवळील वाडीगुडी यागावी सासुरवाडीकडे चालले होते. मात्र, सायंकाळी त्यांचा नागापूर येथे अपघात झाला. त्यात त्यांना जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी मनमाड येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मालेगाव येथे जात असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी भाग्यश्री, मुलगी आरोही (6) मुलगा आदित्य (4) आणि भाऊ असा परिवार आहे. (Indian Soldier Tejas Jaywant Aaher)
त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच गावावर शोककळा पसरली. अंत्यसंस्कारावेळी यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक कैलास वाघ तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. प्रहारचे गणेश निंबाळकर, शिवसेनेचे शिवा सुराशे यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे , डॉ. नितीन गांगुर्डे, गीता झाल्टे उपस्थित होते.