

सिडको (नाशिक) : सिडको परिसरातील पंडित नगर येथे फूटपाथवर झोपलेल्या एका ४२ वर्षीय नागरिकाचा अज्ञात वाहनाच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशीच घडलेल्या या अपघातामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मृताचे नाव अर्जुन तुळशीराम महाजन (वय ४२) असे असून ते सिडको परिसरातच वास्तव्यास होते. अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि.23) रोजी रात्री सुमारे पावणे दहा वाजता पंडित नगर परिसरात रस्त्याच्या कडेला अर्जुन महाजन झोपलेले असताना, अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की अर्जुन महाजन यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्विंद्रसिंग राजपूत आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, अर्जुन महाजन हे एकटेच राहत होते आणि छोटेमोठे काम करून उदरनिर्वाह करत होते.