

नाशिक : शहरात मागील तीन महिन्यांत तब्बल ७६५ नव्या क्षयरुग्णांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत नाशिक महापालिकेतर्फे अलीकडेच राबविण्यात आलेल्या सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेत ५५ नवीन सक्रिय रुग्ण आढळले आहेत.
क्षयरोगावरील सध्या उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची एकूण संख्या २,८५८ वर पोहोचली आहे. ही स्थिती आरोग्य यंत्रणेसाठी मोठा इशारा मानली जात असून, क्षयरोग नियंत्रणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
शहरात अलीकडेच क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. शहर क्षयरोग केंद्राने त्यांना आवश्यक साहित्य पुरवून संशयित रुग्णांचे थुंकी नमुने गोळा करण्याचे कार्य दिले होते. प्रत्येक पथकात आशा, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांचा समावेश होता. अशा एकूण १०० प्रशिक्षित पथकांनी दररोज ४० ते ५० घरे गाठली. या व्यापक मोहिमेत सुमारे दोन लाख नागरिकांच्या गृहभेटी घेण्यात आल्या आणि क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्यांचा शोध घेण्यात आला. त्यातून ४,५८८ संशयित रुग्णांची नोंद झाली.
संशयित रुग्णांची थुंकी, एक्स-रे, सिबिनेट आणि आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर ५५ नव्या क्षयरुग्णांची नोंद झाली. यामुळे गेल्या तीन महिन्यांतील क्षयरुग्णांची एकूण संख्या ७६५ झाली असून, सध्या २,८५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये क्षयरोग निदान व उपचार सेवा पूर्णतः मोफत उपलब्ध आहे.
झोपडपट्टी, वीटभट्टी, भटक्या जमाती, स्थलांतरित कामगार, बेघर, मध्यवर्ती कारागृह, वृद्धाश्रम आदी ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. तसेच विविध ठिकाणी क्षयरुग्ण तपासणी शिबिरांचे आयोजन करून संशयित रुग्णांच्या छातीचे हँडल ए-क्सरे मशीनद्वारे ए-क्सरे काढण्यात आले. संशयित क्षयरुणांची तपासणी करण्यात येऊन निदान झालेल्या क्षयरुणांना उपचारासाठी संदर्भीत करण्यात आले.
दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला
सायंकाळी येणारा हलकासा ताप,
भूक मंदावणे, वजनात लक्षणीय घट,
थुंकीवाटे रक्त पडणे, चालताना धाप लागणे,
मानेवरील न दुखणाऱ्या गाठी आदी
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णांना सोयी सुविधा पुरविल्या जातात. तसेच दानशूर व्यक्ती, संस्थांमार्पत क्षयरुग्णांना उपचार सुरू असेपर्यंत कोरडा आहार पुरविला जातो. त्यांना निक्षय मित्र संबोधले जाते. क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी निक्षय मित्रांनी पुढाकार घ्यावा.
डॉ. शिल्पा काळे, क्षयरोग अधिकारी, नाशिक महापालिका.
योग्यवेळी योग्य उपचार मिळाल्यास क्षयरुग्ण पुर्णत: बरा होता. २०२४ मध्ये नाशिक शहरात ३३३६ क्षयरुग्ण होते. उपचाराअंती यापैकी ९१ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता रुग्णालयात उपचार घ्यावेत. शासकीय तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये क्षयरोगावर मोफत उपचार दिले जातात.