

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या एचएमआयएस पोर्टलवर शहरातील खासगी रुग्णालयांना बाळंतपण तसेच यासंदर्भातील माहिती भरणे बंधनकारक असताना तब्बल ६९ टक्के रुग्णालयांकडून माहितीची दडवादडवी केली जात असल्याचे समोर आले आहे. अवघ्या ३१ टक्के रुग्णालयाकडून पोर्टलवर माहिती भरली जात असल्याची बाब पाहणीत आढळली आहे. त्यामुळे संबंधित रुग्णालयांना 15 दिवसांची मुदत देऊन पोर्टलवर माहिती भरण्यासाठी नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्यानंतरही माहिती न भरल्यास रुग्णालयांची मान्यता रद्द केली जाणार आहे.
महात्मानगर येथील पंड्या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याचा प्रकार सप्टेंबर २०२४ मध्ये उघडकीस आला होता. तक्रारीनुसार महापालिकेने रुग्णालयात छापा टाकला असता, त्यात गर्भपातासाठी लागणारी औषधे तसेच इतर साहित्य आढळले होते. राज्य मागासवर्गीय आयोगाने माता मृत्यूप्रकरणी पंड्या रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पंड्या रुग्णालयातील प्रकार समोर आल्यानंतर महापालिका हद्दीत मुलींच्या जन्मदरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एचएमआयएस पोर्टलवर गर्भधारणा, प्रसूती, गर्भपात, कॉपर-टी आदी संदर्भात माहिती भरली जात नसल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांकडून नियमित माहिती भरली जाते. खासगी रुग्णालयांपैकी ३१ टक्के रुग्णालयांकडून माहिती भरली जाते. ६९ टक्के रुग्णालये माहिती भरत नसल्याचे समोर आल्याने रुग्णालयांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एचएमआयएस पोर्टलवर माहिती भरणे बंधनकारक आहे. परंतु ३१ टक्के माहिती भरली जात असल्याने उर्वरित ६९ टक्के रुग्णालयांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत
स्मिता झगडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका, नाशिक.