

नाशिक : घरपट्टी, पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले असून, वारंवार नोटीसा, जप्ती वॉरंट बजावूनदेखील घरपट्टी न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करून या मिळकतींचा लिलाव करण्याचे आदेश महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी कर वसुली विभागाला दिले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सहाही विभागांतील ६४ मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांच्या अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
घरपट्टी वसुलीसाठी कर विभागाला २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २४५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २३९ कोटी ८१ लाखांची वसुली करण्यात कर विभागाला यश आले. घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेने नियमित करदात्यांसाठी लागू केलेली सवलत योजना, थकबाकीदारांसाठी राबविलेल्या अभय योजनेमुळे घरपट्टी वसुलीचा आकडा उद्दिष्टाच्या जवळपास पोहोचला असला तरी घरपट्टीच्या मागील थकबाकीचा आकडा चिंताजनक असल्यामुळे थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश आयुक्त खत्री यांनी दिले होते.
नवीन नाशिक १८, पंचवटी ९, नाशिक रोड १०, सातपूर ९, नाशिक पूर्व १०, नाशिक पश्चिम ८, एकूण ६४
त्यानुसार थकबाकी वसुलीसाठी कर विभागाने सहाही विभागांतील ४२६ बड्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावले होते. या थकबाकीदारांकडे १२.७४ कोटी रुपयांची घरपट्टी थकीत आहे. जप्ती वॉरंट बजावल्यानंतर ३७ जणांनी पूर्ण तर ५० जणांनी काही प्रमाणात थकबाकी भरली. त्यांच्याकडून ७० लाख रुपये वसूल करण्यात आले. मात्र अद्यापही थकबाकीचा मोठा आकडा येणे बाकी असल्याने थकबाकीदारांच्या मिळकतींचा लिलाव करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सहाही विभागांतील ६४ मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. यात नवीन नाशिक विभागातील सर्वाधिक १८ मिळकतींचा समावेश आहे.