नाशिक : जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनंतर प्रशासनाने परिचरांच्या बदल्या केल्या आहेत. सोमवारी (दि.५) रातोरात या ५१ परिचरांच्या बदल्या केल्या गेल्याने परिचर संवर्गामध्ये संभ्रम तयार झाला आहे. त्यातच प्रामुख्याने बांधकाम विभागातील परिचरांना हटविण्यात आले असून, इतर विभागातील परिचरांना येथे बदली देण्यात आली आहे. (The administration has transferred attendants in Zilla Parishad.)
जिल्हा परिषदेतील गट 'ड' मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे अधिकार सीईओ यांना आहेत. मात्र, या संवर्गातील कर्मचाऱ्यांना एकाच विभागात तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल तरच या बदल्या केल्या जातात. जिल्हा परिषदेमधील तिन्ही बांधकाम विभागांमध्ये असलेल्या परिचरांबाबत तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. गेले अनेक वर्षे याच जागेवर असल्याने परिचरांची अघोषित मक्तेदारी तयार झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये होती. यावर उपाय म्हणून प्रशासनाने रातोरात सर्वच परिचरांच्या बदल्या केल्या. बदली केलेल्या परिचरांना तत्काळ प्रभारी सीईओ डॉ. अर्जुन गुंडे यांच्या स्वाक्षरीचे आदेश देण्यात येऊन नव्या जागेवर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.
सर्वच विभागातील परिचरांच्या रातोरात बदल्या झाल्याने विभागप्रमुखांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. काही विभागप्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्याची पाठराखण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला साकडे घातले असल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये होत आहे.