

नाशिकला अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र या अत्यल्प पावसातही पंचवटी, आडगाव परिसरातील २९ ठिकाणी रस्त्यांवर, चौकांत, सिग्नल असलेल्या रस्त्यांच्या मध्यभागी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचून तळी अवतरली आहेत. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांची या तळ्यांमुळे तारांबळ उडत आहे. स्मार्ट सिटीचा मुकूट मिळविण्यासाठी सज्ज असलेल्या नाशिकमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थितरीत्या करण्याबाबत कोणताही स्मार्टनेस दिसून येत नसल्याचा विरोधाभास दिसून येत आहे.
तळ्यातील पाण्यातून वेगाने वाहन जाताच रस्त्यांवरील पाणी अंगावर उडून कपडे खराब होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तसेच अशा वेळी समोरून येणाऱ्या वाहनाबरोबरच शेजारील वाहनावरदेखील लक्ष ठेवावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष घालून सदरची समस्या सोडविणे अत्यंत गरजेचे आहे.
ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याने रस्ता, चौक, सिग्नल, रस्ता दुभाजक, फुटपाथच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेला योग्य प्रमाणात उतार दिलेला नाही. तसेच उताराच्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी चेंबर नसल्याने जागोजागी तळी तयार झाली आहेत. पंचवटीतील जुना आडगाव नाका, मखमलाबाद रोड, क्रांतीनगर, ड्रिम कॅसल चौक, मालेगाव स्टॅण्ड, दिंडोरी रोड, औरंगाबाद नाका, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, नाग चौक, गजानन चौक, सरदार चौक, पेठ नाका, रामवाडी, हनुमानवाडी, निमाणी, सेवाकुंज, अमृतधाम चौक, पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डसमोरील परिसर, मेहेरधाम, तारवालानगर, मेरी, म्हसरूळ, हिरावाडी रोड, कार्यसिद्धी चौक, नांदूर नाका, आडगाव, जत्रा हॉटेल चौक, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी मार्ग या २९ ठिकाणी चौकाचौकांत रस्त्याच्या मधोमध, तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला तळी नजरेस पडत आहेत. गंगाघाटाजवळील परिसर वर्षानुवर्षे जलमय होत आहे. या रस्त्यावर पादचाऱ्यांना व दुचाकीस्वारांना यातून वाट काढणे अवघड होत आहे.
पावसाळ्यात दर वर्षी याच परिसरात वर्षानुवर्षे तळे साचत असताना महापालिकेतील अधिकारी याकडे डोळेझाक करत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पावसाळी कामांच्या घोषणा व दुरुस्तीची कोट्यवधी रुपयांची टेंडर काढली जातात. मात्र, वर्षानुवर्षे परिस्थिती जैसे थेच आहे. नाशिक शहर स्मार्ट सिटीचे ठिकठिकाणी फलक लावून प्रसिद्धी मिळवली जात असताना प्रत्यक्ष कामात तो स्मार्टनेस कुठेही दिसून येत नाही.