Nashik News | 'झुलेलाल' मध्ये 100 कोटींचा घोटाळा, 1997 पासूनचे फेरलेखापरीक्षण

Jhulelal institution : विद्यमान संचालक मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, पतसंस्थेला उभारी देण्यासाठी अनेक उपाययोजना
देवळाली कॅम्प
देवळाली कॅम्प : संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करताना रतन चावला, हरीश दिवानी, ऋतिका कलानी, कंचन लोकवानी आदी.(छाया : सुधाकर गोडसे)
Published on: 
Updated on: 

देवळाली कॅम्प : सुमारे 5000 सिंधी बांधवांच्या माध्यमातून साकारलेल्या झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेत गेल्या 30 वर्षांमध्ये तत्कालीन संचालक मंडळाने गैरव्यवहारातून मोठे आर्थिक नुकसान केले असल्याने 1997 ते 2024 या कालावधीचे फेरलेखापरीक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यमान संचालक मंडळाने घेतला आहे. यादरम्यान प्रथमदर्शनी 100 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप अध्यक्ष रतन चावला यांनी केला आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीस रतन चावलांसह उपाध्यक्ष हरीश दिवानी, संचालक हेमंत वजीरानी, चंद्रकांत वेंसियानी, गोपाल सचदेव, ऋतिका कलानी, कंचन लोकवानी, हेमंत पमनानी, प्रकाश कलवानी, भगवान मोटवानी, व्यवस्थापक रमेश जाधव आदी उपस्थित होते. त्यात गत संचालक मंडळाच्या कारभाराची चिकित्सा करण्यात आली. झुलेलाल बँकेचे रूपांतर झुलेलाल पतसंस्थेत करून मागील संचालक मंडळाने अनेक घोटाळे केलेले आहेत. हे सर्व घोटाळे त्या त्या वेळेच्या ऑडिटर्सनी आपल्या अहवालामध्ये नमूद केलेले आहेत. याबाबत कायद्यातील तरतुदीनुसार अनेकांना नोटिसादेखील पाठवलेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत कोट्यवधीचे कर्ज घेणाऱ्या संचालक मंडळाने व्याज शून्य टक्के ठेवल्यामुळे पतसंस्थेला मोठा आर्थिक तोटा झाला आहे. अनेक बोगस खाती उघडून त्याद्वारे कर्जवाटप केलेले आहे. अनेकांनी कर्ज काही प्रमाणात भरलेले असताना, पतसंस्थेच्या दप्तरी तशी नोंद दिसून येत नाही. हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले जात असताना पतसंस्था नव्याने उभारी घेणे गरजेचे आहे, याकडे चावला यांनी लक्ष वेधले.

स्वतःचा निधी जमा

सभासदांनी फेब्रुवारी 2024 मध्ये रतन चावला, कन्नूशेठ कलानी, प्रकाश अहुजा, नवीन गुरुनानी, प्रकाश लखवानी यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला सत्ता दिली. नवीन संचालक मंडळाने संपूर्ण कारभाराची माहिती घेताना अनेक बाबी उघड झाल्या आहेत. प्रत्यक्षात संचालक मंडळाने 9 एप्रिल 2024 ला कामकाजाला सुरुवात केली. त्यावेळी संचालक मंडळाने 164 थकबाकीदारांना कलम 101 अन्वये नोटिसा पाठवल्या होत्या. त्यात सुमारे 4 ते 5 कोटींचे कर्ज आहे, तर पतसंस्थेला ठेवीदारांचे तीन ते साडेतीन कोटी रुपये देणे आहेत. अनेक माजी संचालकांना कर्ज देताना अनियमितता दर्शवल्याचे दिसून येत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी पतसंस्थेचे कोट्यवधी व्याज माफ करण्यात आलेले आहे. पतसंस्थेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळाने स्वतःचा निधी जमा करून सभासद व ठेवीदारांना दिलासा देण्याचे काम सुरू केले आहे.

नऊ लाखांचे कर्जवाटप

अवघ्या दोन महिन्यांत संस्थेने नऊ लाखांचे नवीन कर्ज वाटप केले आहे, तर नवीन सभासदांच्या माध्यमातून शेअर्स व ठेवीदेखील जमा केल्या जात आहेत. शिवाय डेली कलेक्शनच्या माध्यमातून दररोज 20 ते 22 हजार रुपयांचा निधी जमा होत आहे. पतसंस्थेने ऑनलाइन व्यवहार सुरू करण्याची कार्यवाही पूर्ण केली असून, दि. १ ऑगस्टपासून सभासद व खातेदारांना एनएफटी तसेच आरटीजीएस या सुविधा उपलब्ध होणार असल्याचे चावला यांनी सांगितले.

गत संचालक मंडळातील काहींनी चुकीचे कामकाज केल्याने कोट्यवधींचा तोटा दिसत आहे. यासाठी 1997 पासूनचे मीटिंगचे प्रोसिडिंग, ठराव तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पाठवलेल्या सूचना या सर्वांची माहिती घेऊन ज्यांनी व्यवहारात अनियमितता दर्शविली आहे, त्यांच्यावर सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करत संबंधितांकडून थकबाकी वसूल केली जाईल. याबाबत कोणालाही सोडले जाणार नाही.

रतन चावला, अध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news