नाशिक : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असतानाच भुजबळ यांचे कट्टर समर्थक समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून 'राष्ट्रवादी' गायब झाली आहे. खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भुजबळ कुटुंबीयांचे फोटो आहेत. राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना डावलण्यात आले. त्यावर भुजबळ यांनी खुली नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यानंतर, भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार यांच्यावर बोलण्यास भुजबळ यांनी टाळाटाळ केली. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जिल्हा दौऱ्यात, शाह यांनी भुजबळ यांना आपल्या शेजारी मानाचे स्थान देत त्यांच्याशी गुफ्तगू केले. त्यामुळे भुजबळ भाजपत प्रवेश करणार या चर्चा सुरू आहेत. यातच, भुजबळ यांचे समर्थक असलेले खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध भागांत बॅनर लावण्यात आले आहे.
खैरे हे भुजबळ यांचे निकटवर्तीय आहे, त्यांच्या समता परिषदेचे नेते ते आहेत. परंतु, त्यांच्या बॅनरवर अजित पवार यांसह राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचा तसेच पक्षचिन्हाचादेखील उल्लेख नाही. बॅनरवर केवळ पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो आहेत. तसेच भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांचे फोटो आहेत. बॅनवरवरून राष्ट्रवादी गायब झाल्याने भुजबळ यांच्या पक्षातंराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.