Nashik | राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन : शहरात आजपासून प्रौढांना बीसीजी लस

क्षयरोग निर्मुलन : महापालिकेची मोहिम; २.५ लाख लाभार्थींचे लसीकरण
बीसीजीची लस
नाशिक शहरातील २ लाख ५० हजार प्राैढ व्यक्तींना आजपासून (दि. ३) बीसीजीची लस देण्यात येणार आहे. file photo
Published on
Updated on

नाशिक : राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलनाअंतर्गत नाशिक शहरातील २ लाख ५० हजार प्राैढ व्यक्तींना आजपासून (दि. ३) बीसीजीची लस देण्यात येणार आहे. महापालिकेमार्फत ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. पुढील तीन महिने ही मोहिम राबविली जाणार आहे. (In Nashik city Adults will be given the BCG vaccine)

लसीकरणासाठी पात्र व्यक्ती

  • पूर्वी टीबीचा उपचार घेतलेले क्षयरुग्ण

  • क्षयरुग्णांच्या सहवासातील/संपर्कातील व्यक्ती

  • वयाची ६० पूर्ण असलेले नागरिक

  • मधुमेह असलेल्या व्यक्ती

  • धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती

  • ज्यांचा बॉडी मास इंडेक्स १८ पेक्षा कमी आहे

    (बॉडी मास इंडेक्स - Body mass index शरीर वस्तुमान निर्देशांक) हे एक शरीराचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर आहे. किलोग्रॅम मधील वजनाला मीटर मधील उंचीच्या वर्गाने भागले असता बॉडी मास इंडेक्स कळतो. १८ ते २५ हा नॉर्मल बॉडी मास इंडेक्स आहे. २५ ते ३० बॉडी मास इंडेक्सला वाढलेले वजन असे म्हणतात.)

देश क्षयरोगमुक्त करण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचा च एक भाग म्हणून बालकांप्रमाणे १८ वर्षावरील प्राैढांना बीसीजी लस दिली जाणार आहे. नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत त्याकरीता व्यापक मोहिम राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील अतिजोखमीच्या गटातील २ लाख ५० हजार लाभार्थ्यांचे या मोहिमेत लसीकरण केले जाणार आहे. लसीकरीता संमती दिलेल्या तसेच शासनाच्या टीबी-वीन पोर्टलवर नोंदणी असलेले व नोंदणी नसलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

महापालिकेतर्फे लसीकरण मोहिमेसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मोहिमेच्या अंमलबजावणीची जबाबदारी क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा काळे, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, महानगरपालिका दवाखानाच्या स्तरावर आशा स्वयंसेविका, परिचारिका, क्षयरोग कर्मचारी यांच्यामार्फत लस देण्यात येणार आहे. नागरिकांनी क्षयमुक्त भारतासाठी एक पाऊल पुढे येत मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

लस कोणाला द्यायची नाही

  • १८ वर्षेपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती

  • संमती न दिलेल्या व्यक्ती

  • गंभीर आजारी/दुर्धर आजारी

  • गरोदर माता/स्तनदा माता

  • एचआयव्ही इतिहास असलेल्या व्यक्ती

  • गेल्या ३ महिन्यात रक्त चढवून घेतलेल्या व्यक्ती

महापालिकेतर्फे शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व खासगी, शासकीय, आरोग्य यंत्रणांनी एकत्रित येऊन काम करावे.

डॉ. तानाजी चव्हाण, आरोग्य अधिकारी, महापालिका. नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news