

नाशिक : नाशिकमधील हिंदू खाटिक समाजाने 'हलाल' मटणच विक्री करण्याचा निर्धार करत मंत्री नितेश राणे यांना 'झटका' दिला आहे. खाटिक समाजाला व्यवसायासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. शास्त्रीयदृष्ट्या खाण्यास अयोग्य असलेले झटका मटण हे महाराष्ट्रात कोणीही स्वीकारणार नाही.
महाराष्ट्रात 'हलाल'चाच पुरस्कार समस्त खाटिक समाजातील बांधव करतील, असा निर्धार व्यक्त करत धार्मिक व जातीय सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही धिक्कार करतो, अशा शब्दांत राणे यांच्या भूमिकेचा नाशिकमधील खाटिक समाजाने निषेध केला आहे.
राणे यांच्या एका घोषणेमुळे राज्यात 'हलाल'विरोधात 'झटका' मटण असा वाद सुरू झाला आहे. हलाल मटणाला विरोध करत हिंदूंसाठी झटका मटण विक्रीसाठी 'मल्हार' प्रमाणपत्रासह मांसविक्री करणारी दुकाने उघडली जातील. हिंदूंनी त्याच दुकानांमधून मटण खरेदी करावे, असे आवाहन राणे यांनी केले आहे. राणे यांच्या या भूमिकेला राज्यभरातून विरोध होत आहे. नाशिकमधील खाटिक समाजानेदेखील बैठक घेत राणे यांच्या भूमिकेचा निषेध केला आहे.
हिंदू खाटिक समाजाचे नेते राजेंद्र बागूल यांनी या बैठकीत समाजाची भूमिका मांडली. बागूल म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये क्षत्रिय खाटिक समाज हा सर्वार्थाने हलाल पद्धतीचे मटण विक्री करतो. हिंदू समाजामध्ये हलाल पद्धतीचेच मटण विकले जाते. कोणताही हिंदू खाटिक सल्ला मारत नाही. ते आपले काम नाही; सल्ला हे मुसलमान खाटिकच मारतात. आम्ही सल्ला मारत नाही. त्यामुळे आम्हाला 'झटका' मारायला कोणी लावू नये. खाटिक समाजाला व्यवसाय करायला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. शास्त्रीयदृष्ट्या खाण्यास अयोग्य असलेले झटका मटण हे महाराष्ट्रात कोणीही स्वीकारणार नाही, असेही यावेळी बागूल यांनी सांगितले.
आम्ही जन्मजात खाटिक असून, आम्हाला आमच्या व्यवसायाचं प्रमाणपत्र ज्याचा धर्माशी, जातीशी संबंध नाही त्यांनी देण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. धार्मिक व जातीय सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही धिक्कार करीत आहोत, अशी भूमिकाही बागूल यांनी मांडली. या बैठकीस समाजाचे नेते रमेश जाधव, विद्येश लाड, जितेंद्र बागूल, योगेश घोलप, शैलेंद्र बागूल, अंकुश कोथमिरे, अभिषेक कोथमिरे, अनिल कोथमिरे, सिद्धेश बागूल, बाळासाहेब बागूल, रूपेश धनगर, कैलास बागूल, गणेश घोलप, आनंद घोलप, दुष्यंत बागूल, प्रितीश खराटे आदी उपस्थित होते.
आमचा एकच धर्म महाराष्ट्र धर्म. त्याला आम्ही गालबोट लावू देणार नाही. कोणा लुंग्या- सुंग्याचे ऐकून आमच्या प्रथा-परंपरा व सर्व जाती-धर्माची एकी आम्ही खर्ची पडू देणार नाही. या महाराष्ट्रात 'हलाल'चाच पुरस्कार समस्त खाटिक समाजातील बांधव करतील. आमच्या समाजातील ऐक्य कोणत्याही परिस्थिती तुटणार नाही. माझा व्यवसाय करायला मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही.
राजेंद्र बागूल, नेते, हिंदू खाटिक समाज, नाशिक.