

नाशिक : महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला असून, त्यात राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मूल्यांकनात नाशिक विभागातील जिल्हा तसेच प्रादेशिक कार्यालयांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत राज्यात अव्वलस्थान पटकावले आहे.
शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात दुसऱ्या टप्प्यात राज्याच्या सर्व महसुली विभागांमधील ४० विभागस्तरीय कार्यालयांच्या व सर्व जिल्ह्यांमधील ४२ जिल्हास्तरीय कार्यालय या स्पर्धेत सहभागी झाले होते. सामाजिक न्याय विभागाच्या राज्यातील जिल्हा कार्यालयामध्ये नाशिक विभागातील सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव हे कार्यालय राज्यात अव्वल ठरले आहे. राज्यातील जिल्हा कार्यालयांमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, तर विभागीयस्तरावरील विभागीय प्रादेशिक कार्यालयांमध्ये प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण नाशिक विभाग या कार्यालयाने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागात नाशिक विभागातील सर्वाधिक तीन कार्यालयांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मूल्यांकन मिळाल्याने नाशिक विभागाने राज्यात अव्वलस्थान निर्माण केले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार, भारतीय गुणवत्ता प्राधिकरणाने नुकतेच कार्यालयाची यासंदर्भात पाहणी केली होती. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, तसेच समाजकल्याण आयुक्तालय पुणे येथील वरिष्ठ अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आणि नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागातील जिल्हा व प्रादेशिक कार्यालयांनी ही कामगिरी केली आहे.
शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात वेबसाइट सुधारणा, कार्यालयीन सोयी-सुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर आदी दहा मुद्यांवर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणारा जिल्हा म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा उद्योग केंद्राची निवड केली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने या उपक्रमात अव्वल स्थान पटकावले आहे.