NASHIK MVP MARATHON 2025 | 'फूल मॅरेथॉन'चे तिन्ही विजेते महाराष्ट्राचेच !

गुलाबी थंडीत धावले नाशिककर : डॉ. करकेरा 'नाशिक मविप्र मॅरेथॉन- २०२५'चा विजेता
NASHIK MVP MARATHON 2025
NASHIK MVP MARATHON 2025file
Published on
Updated on

नाशिक : 'नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२५' स्पर्धेतील ४२.१९५ किमी फूल मॅरेथॉनचे विजेतेपद मुंबईच्या डॉ. कार्तिक जयराज करकेरा याने पटकावले. त्याने दोन तास २० मिनिटे या विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला.

मविप्र समाज संस्थेतर्फे रविवारी (दि. १२) क्रीडाप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या नवव्या राष्ट्रीयस्तर, १४ व्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी फूल मॅरेथॉनने प्रारंभ झाला. वेगवेगळ्या १४ गटांमध्ये झालेल्या स्पर्धेत चार हजारांहून अधिक आबालवृद्ध धावपटूंनी सहभाग नोंदवला. भारतीय हॉकी संघातील खेळाडू तथा रियो ऑलिम्पिकपटू रेणुका यादव, आयोजन समितीचे अध्यक्ष तथा संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षीरसागर, विश्वास मोरे, दिलीप दळवी, देवराम मोगल, डॉ. सयाजीराव गायकवाड, ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, ॲड. आर. के. बच्छाव, ॲड. संदीप गुळवे, शिवाजी गडाख आदींच्या उपस्थितीत मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखण्यात आला.

स्पर्धेसाठी देशभरातून साडेतीन हजारांपेक्षाही जास्त स्पर्धक सहभागी झाले. फूल मॅरेथॉनमधील पहिले तिन्ही धावपटू हे महाराष्ट्रातील आहेत. नाशिकच्या सिकंदर तडाखे याने गतवर्षीप्रमाणे यंदाही द्वितीय स्थान कायम ठेवत गतवेळेपेक्षा यंदा सहा मिनिटे २१ सेकंद आधी स्पर्धा पूर्ण करून स्वतःचाच विक्रम मोडला. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून त्यांचा उत्साह वाढविला. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाने रंगत वाढवली.

बक्षीस वितरण समारंभ कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला. यावेळी विविध १४ गटांतील विजेत्यांसह सहभागी धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा निरीक्षक राजा वेणू म्हणाले की, मविप्रने संस्थेसाठी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे मानांकन घ्यावे, असे सांगून रुग्णवाहिका व वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ. विलास देशमुख, डॉ. अजित मोरे, प्रा. दौलत जाधव, डॉ. के. एस. शिंदे, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांच्यासह आयोजन समितीच्या डॉ. मीनाक्षी गवळी, प्रा. हेमंत पाटील, प्रा. डॉ. सुनील धोंडगे आदींंनी परिश्रम घेतले.

मविप्र मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अत्यंत सूक्ष्म व काटेकोर नियोजन आखण्यात आले. स्पर्धेसाठी विदेशातील धावपटूंनीही नोंदणीसाठी संपर्क साधला. मात्र, कायदेशीर कारणांमुळे त्यांना सहभाग घेता आला नाही. स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

- ॲड. नितीन ठाकरे, आयोजन समिती अध्यक्ष तथा सरचिटणीस, मविप्र संस्था.

'फन रन'ने वेधले लक्ष

यंदाच्या स्पर्धेत वेगवेगळ्या थीमवर आधारित 'फन रन'ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यामध्ये पर्यावरण रक्षण, लेक वाचवा, लेक शिकवा, स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा, झाडे लावा-झाडे जगवा, महिला सक्षमीकरण, निरोगी आरोग्य, योग, जागर शिक्षणाचा या सामाजिक विषयांवर जनजागृतीपर फलक हाती घेऊन स्पर्धक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. ओपन फन रन यामध्ये २६४ धावपटूंनी सहभाग घेतला.

गटनिहाय प्रथम क्रमांकाचे विजेते

डॉ. कार्तज करकेरा, हरीश शेरॉन, ज्योती सरोज, अतुल बर्ड, कार्तिककुमार कारीहारपाल, पूजा पारधी, ऋषिकेश वावरे, पूनम शेवरे, कुणाल ब्राह्मणे, रिद्धिमा मेहता, चैतन्य श्रीखंडे, श्वेता सदगीर, केशव मोटे, डॉ. ऋषिका पटेल.

कार्तिक नवा 'विक्रमादित्य'

फूल मॅरेथॉनमध्ये धावताना डॉ. कार्तिकने २ तास २० मिनिटे अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांकासह मॅरेथॉनचे एक लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. २०१८ मध्ये झालेल्या मॅरेथॉनमध्ये करणसिंग (हरियाणा) याने २ तास २२ मिनिटे ३३ सेकंदांत फूल मॅरेथॉन पूर्ण केली होती. हा विक्रम डॉ. कार्तिकने मोडीत काढला. दिंडोरी तालुक्यातील सिकंदर तडाखेने २ तास २० मिनिटे २ सेकंद अशी वेळ नोंदवत दुसऱ्या क्रमांकाचे एक लाखाचे, तर वर्ध्याचा विक्रम बंगरियाने २ तास २० मिनिटे १२ सेकंद इतक्या वेळात स्पर्धा पूर्ण करत तृतीय क्रमांकाचे ७५ हजारांचे पारितोषिक पटकावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news