

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयांमधील औषध व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सर्व रुग्णालयांमध्ये 'मॉडेल औषध भांडार' उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी आरोग्य विभागाला दिले.
त्याचबरोबर रुग्णालयातील सेवा अधिक सुसूत्र करण्यासाठी शासनाची 'ई-सुश्रुत' प्रणाली कार्यान्वित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी मंगळवारी इंदिरा गांधी रुग्णालयाला अचानक भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आढावा घेतला. बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, औषध भांडार, प्रयोगशाळा आदी विभागांना भेट देऊन त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामकाजाची माहिती घेतली.
रुग्णालयातील आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ, उपचार व्यवस्था आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेत रंजन यांनी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना दिल्या. प्रस्तावित अतिदक्षता विभागात रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी सुसज्ज अग्निशमन प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या पाहणीवेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, इंदिरा गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक रिना ढिकले तसेच बांधकाम व विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
४ सप्टेंबरपर्यंत सिंहस्थ कामे सुरू करा !
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने इंदिरा गांधी रुग्णालयातील बांधकाम व विद्युतविषयक कामे जास्तीत जास्त ४ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश रंजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यानंतर रंजन यांनी तपोवन येथील प्रस्तावित रुग्णालयाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. बांधकामाची सद्यस्थिती, कामाची गती आणि आवश्यक सुविधांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.