

नाशिक : आमदार संविधानावर विश्वास असून, या देशाचा कायदा सर्वांसाठीच समान आहे. भारत हा देश संविधानावर चालत असून, या देशातील निवडणुका लोकशाही पद्धतीनेच होणे अपेक्षित आहे. आगामी महापालिका निवडणुकीत केवळ नाशिक जिल्हाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांना जागा दाखवून देऊ, असे आव्हान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन' पक्षाचे (एमआयएम) प्रदेशाध्यक्ष इम्पियाज जलील यांनी दिले.
जुने नाशिकमधील चौक मंडई येथील वाकडी बारव चौकामध्ये शनिवारी (दि.१३) आयोजित केलेल्या एमआयएमच्या जाहीर सभेत ते बोलत होते. जलील म्हणाले, सरकारने मुस्लिमांना मिळणारी हजचे अनुदान बंद केले; मात्र त्या मोबदल्यात एकही चांगल्या दर्जाची शाळा, महाविद्यालय किंवा रुग्णालय कुठल्याही जिल्ह्यात अल्पसंख्याकबहुल परिसरात उभारले नाही. सत्ताधाऱ्यासह सर्वच राजकीय पक्षांनी मुस्लीम, दलित बहुजन समाजाचा आतापर्यंत सत्ता मिळविण्यासाठी केवळ वापर केला आहे. मात्र, आता अल्पसंख्याक समाजाचे लोक जागे झाले आहेत. हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असेही जलील यावेळी म्हणाले. भद्रकाली पोलिस ठाण्यासह आयुक्तालयाकडून सभास्थळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दुचाकीने सभास्थळी पोहोचले
जलील सभास्थळी पदाधिकाऱ्याच्या दुचाकीवर बसून पोहोचले. नाशिक शहराच्या वेशीवर असताना, त्यांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. सभास्थळी नियोजित वेळेत पोहोचता यावे, यासाठी त्यांनी पदाधिकाऱ्याच्या दुचाकीने सभास्थळ गाठल्याचे स्वत: जलील यांनीच सांगितले.
तपोवन आंदोलनाला पाठींबा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात उभारल्या जाणाऱ्या साधुग्रामसाठी तब्बल १८०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. या विरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह अनेक पर्यावरणवादी संघटनांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला आमचाही पाठिंबा असेल, असे जलील यांनी स्पष्ट केले.