नाशिक : तब्बल पावणेचार वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा करताक्षणी या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे. निवडणुकीसाठी आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा खत्री यांनी दहा निवडणूक अधिकारी तसेच ३० सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
मार्च २०२२ मध्ये महापालिकेतील लोकशाही राजवटीचा कालावधी संपुष्टात आला. ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेचा वाद न्यायप्रविष्ठ असल्यामुळे महापालिकेच्या निवडणुका विहित कालावधीत होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे गेल्या पावणेचार वर्षांपासून नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. महापालिकेच्या निवडणुका कधी लागणार याचीच इच्छूकांसह राजकीय पक्षांना आतुरता होती. अखेर त्यांची प्रतिक्षा फळास आली असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर राज्य निवडणूक आयोगाने नाशिकसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार येत्या १५ जानेवारीला नाशिक महापालिकेच्या १२२ जागांसाठी निवडणूक होत असून दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला मतमोजणीतून निवडणूक निकाल समोर येणार आहे.
या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी जोरात सुरू आहे. प्रभागरचना अंतिम करण्यात आली असून प्रभागनिहाय आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे. सोमवारी (दि.१५) निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या देखील प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयुक्तांकडून निवडणुकीची घोषणा होताक्षणी आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी महापालिका आयुक्तांनी दहा निवडणूक अधिकारी व ३० सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
झेंडे, बॅनर्स हटविण्यास प्रारंभ
आचारसंहिता लागू होताक्षणी राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर्स महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग तसेच विभागीय अधिकाऱ्यांमार्फत हटविण्यास प्रारंभ झाला आहे. संपूर्ण महापालिका क्षेत्रात आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
सिंहस्थ कामे आचारसंहितेच्या कात्रीत
नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध विकासकामांची जय्यत तयारी महापालिका प्रशासनामार्फत केली जात होती. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रस्ते, पुल, मलवाहिकांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र सिंहस्थांतर्गत हाती घेतले जाणारे अनेक रस्ते तसेच विविध कामे आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहेत.
एकूण मतदार- १३ लाख 60 हजार ७22
प्रभागरचनेची स्थिती
एकूण सदस्यसंस्खा - १२२
एकूण प्रभाग - ३१
चार सदस्यीय - २९
तीन सदस्यीय - २
महापलिका आयुक्तांची आज बैठक
निवडणुकीच्या तयारीसाठी महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी सर्व खातेप्रमुख, निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणुक अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंगळवारी (दि.१५) बोलविली आहे. या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार असून आचारसंहिंतेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाणार आहेत.
सन २०१७ पक्षनिहाय स्थिती
भाजप - ६६
शिवसेना - ३५
मनसे - ५
काँग्रेस - ६
राष्ट्रवादी काँग्रेस - ६
अपक्ष - ३
आरपीआय (ए) - १
एकूण सदस्यसंख्या - १२२