

नाशिक : महापालिका निवडणुकीत माघारीनंतर सर्वच प्रभागांतील लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. स्वबळावर लढणाऱ्या भाजपमध्ये निष्ठावंतांना उमेदवारी डावलत आयारामांना संधी दिली गेल्यामुळे अपक्षरूपी बंडखोरीचे पीक उभे राहिले असताना, राज्याच्या सत्तेतील घटकपक्ष असलेली शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षच भाजपसमोर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या रूपाने उभे राहिल्याने महापालिका निवडणुकीत खरी लढत ही महायुतीतच होत असल्याचे दिसत आहे.
राज्यातील मित्रपक्ष भाजप व शिवसेना महापालिका निवडणुकीत तब्बल ९६ जागांवर एकमेकांविरोधात, तर युती असूनही शिवसेना राष्ट्रवादी ११ ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे विरोधकांपेक्षा मित्रपक्षांतील स्पर्धेचीच अधिक चर्चा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी देखील एकसंध राहिली नसून, १२२ जागांसाठी महाविकास आघाडीने १६० उमेदवार दिल्याने तब्बल ३८ ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
राज्याच्या सत्तेत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर महायुतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपला सोडून युती करण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीसाठी १०० प्लसचा नारा देणाऱ्या भाजपला प्रभाग १४ मध्ये एकही उमेदवार देता आला नाही. एबी फॉर्मच्या गोंधळामुळे आणखी दोन जागांवर अपक्षांना पुरस्कृत करण्याची वेळ आली. त्यामुळे मूळ भाजप या निवडणुकीत ११६ जागांवर निवडणूक लढवित आहे.
शिवसेनेने ९६ उमेदवार देत भाजपला आव्हान दिले आहे, तर राष्ट्रवादीनेही ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात उत्तरविले आहेत. त्यामुळे विरोधकांपेक्षा मित्रपक्षांतील स्पर्धेचीच अधिक चर्चा आहे. १२२ जागांसाठी शिवसेना भाजपने १३३ उमेदवार दिले असल्याने भाजपविरोधात लढा देणाऱ्या शिवसेना-राष्ट्रवादीतच ११ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.