Nashik Municipal Election : सकाळ-दुपार सत्रात निरुत्साह; सायंकाळनंतर मतदारांच्या रांगा

नागरिकांना घराबाहेर काढण्यासाठी उमेदवारांनी जोडले ‌‘कर‌’!
Nashik Municipal Election
नाशिक : महानगरपालिका निवडणुकीत सायंकाळी सारडा सर्कल येथील नॅशनल उर्दू हायस्कूल येथे मतदारांच्या लागलेल्या रांगा. (छायाचित्रे : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : तब्बल नऊ वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मतदारांमध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच उत्साह दिसेल, पहिल्या टप्प्यात सकाळच्या सत्रात भरभरून मतदान होईल, अशी अपेक्षा होती; परंतु मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या म्हणजेच ‌‘करी‌’च्या दिवशी आलेले मतदान आणि राजकीय गोंधळाचे वातावरण यामुळे दुपारपर्यंत घराबाहेर पडण्यात मतदारांमध्ये निरुत्साह दिसला. त्यामुळे सकाळी 7.30 वाजता मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या सहा तासांत जेमतेम 26.52 टक्केच मतदान झाले. अखेर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही ‌‘कर‌’ जोडून मतदारांना घराबाहेर पडण्याची विनंती केल्यानंतर दुपारनंतर मतदान केंद्रांसमोर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसले.

महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 15) मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी 7.30 पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. जवळपास सर्वच मतदान केंद्रांसमोर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मतदारांच्या स्वागताला हजर होते. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही लोक मतदानासाठी सकाळीच घराबाहेर पडतील, अशी अपेक्षा होती; परंतु सकाळी पहिल्या दोन तासांत जेमतेम 6.51 टक्केच मतदान झाले.

मकरसंक्रांतीचा दुसरा दिवस करीचा दिवस असल्यामुळे कोणाशी वाद नको, अशी मतदारांमधील भाबडी भावना, पैसेवाटपाचे आरोप, मतदान यंत्रे बंद पडल्याच्या घटना, उमेदवारांनी एकमेकांच्या कार्यालयासमोर घातलेला राडा, विशेषत: नाशिकरोड भागात उमेदवाराच्या घरावर झालेली दगडफेक आदी घटनांमुळे निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती आणि काही स्लम भागात लक्ष्मीदर्शनाची प्रतीक्षा यांमुळे मतदार अपेक्षित संख्येने सकाळच्या सत्रात घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना नागरिकांच्या घरोघरी जाऊन हात जोडून मतदानाला घराबाहेर पडण्याची विनवणी करावी लागली.

भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर

केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत असलेल्या महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपने महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटा)ने युती करत भाजपसमोर आव्हान उभे केल्यामुळे महायुतीतील या घटक पक्षांना विरोधकांची गरज भासली नाही. बहुतांश प्रभागांत भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी असा सामना रंगल्याने मतदानाच्या दिवशी या समविचारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची विभागणी झाल्याचे दिसले. कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकल्यामुळे अनेक प्रभागांत वादाच्या घटना घडल्या. यामुळे आमदारांचीही कोंडी झाल्याचे चित्र दिसले.

प्रभाग 5 मध्ये सर्वात कमी, तर 15 मध्ये सर्वाधिक मतदान

पहिल्या सहा तासांत पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वात कमी 12.37 टक्केच मतदान झाले. या उलट याच कालावधीत नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये सर्वाधिक 34.55 टक्के मतदान झाले. या प्रभागातील मतदार सकाळीच घराबाहेर पडल्यामुळे मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले.

पहिल्या टप्प्यात 3.60 लाख मतदान

13 लाख 69 हजार 722 मतदारांपैकी सकाळी 7.30 ते दुपारी 1.30 या पहिल्या सहा तासांत जेमतेम 26.52 टक्के मतदान झाले. या कालावधीत 2 लाख 726 पुरुष, 1 लाख 60 हजार 111 महिला, तर 6 इतर अशा एकूण 3 लाख 60 हजार 843 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारनंतर मतदान केंद्रांसमोर मतदानासाठी गर्दी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news