

नाशिक : महापालिका निवडणूक रिंगणात ९१ माजी नगरसेवकांसह त्यांचे २७ नातलग, वारसदार नशीब आजमावत आहेत. इच्छुक पक्षाकडून उमेदवारी मिळाली नसल्याने तब्बल २५ माजी नगरसेवकांची दांडी गुल झाली आहे. आरक्षणामुळे काहींना प्रभाग बदलावा लागला, तर काहींना घरातील महिला सदस्यास निवडणूक रिंगणात उतरवावे लागले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. राजकीय पक्षांसह अपक्ष मिळून ७३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढती होत आहेत. ही निवडणूक महायुती, महाविकास आघाडीद्वारे लढविली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, इच्छुकांची मोठी संख्या महायुती, महाविकास आघाडीला छेद देणारी ठरली.
भाजपने स्वबळाची वाट धरली. महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युती केली. त्यातही ११ जागांवर या दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत. हेच चित्र महाविकास आघाडीतही आहे. त्यामुळे युती आणि आघाडी असली, तरी संबंधित राजकीय पक्षांना ताळमेळ साधता आलेला नाही. या निवडणुकीत जवळपास ९१ माजी नगरसेवक आपले नशीब पुन्हा एकदा आजमवणार आहेत. माजी नगरसेवकांचे २७ नातलग निवडणुकीत आहेत. त्यात मुलगा, मुलगी, स्नुषा, पत्नी, पती तसेच पुतण्याचा समावेश आहे.
भाजपचे ४५ माजी नगरसेवक रिंगणात
भाजपचे सर्वाधिक ४५ माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय शिवसेना शिंदे गटातून २५, शिवसेना उबाठातील ७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ४ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. यासह काँग्रेसचा १, माकपचा १, भाकपचे २, रिपाई आठवले गटाचे ३, मनसेच्या ३ माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
६ माजी नगरसेवक 'अपक्ष'
पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने ६ माजी नगरसेवकांवर अपक्ष निवडणूक लढविण्याची नामुश्की ओढावली आहे. यात शशिकांत जाधव, मुकेश शहाणे, अशोक मुर्तडक, रुची कुंभारकर, अंबादास पगारे, मीरा हांडगे आणि सुनीता पिंगळे यांचा समावेश आहे.