Nashik | शहरातील धोकेदायक गुलमोहोर झाडे हटवण्याचा महापालिकेचा निर्णय

नाशिक महापालिका: धोकेदायक 'गुलमोहोर' हटविणार
Nashik | शहरातील धोकेदायक गुलमोहोर झाडे हटवण्याचा महापालिकेचा निर्णय

नाशिक : गुलमोहोराचे झाड अथवा फांद्या कोसळून गेल्या दोन महिन्यात दोघांचा बळी गेल्यानंतर शहरातील धोकेदायक गुलमोहोरची झाडे हटवून देशी प्रजातीच्याच झाडांची लागवड करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे. त्यासाठी शहरातील गुलमोहोराच्या झाडांचे सर्वेक्षण केले जात असून अतिधोकेदायक असलेल्या गुलमोहोराच्या झाडांची छाटणी तसेच आवश्यकतेनुसार संपूर्ण झाडच तोडण्याची भूमिका उद्यान विभागाने घेतली आहे.

Summary
  • १९९२ व १९९६च्या पंचवार्षिकमध्ये विकास दाखविण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात गुलमोहराची लागवड झाली होती.

  • तकलादु झालेली गुलमोहर झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. वाऱ्याची मोठी झुळूक आली तरी फांद्या तुटून पडतात.

  • त्यामुळे धोकादायक वृक्षाच्या फांद्या छाटणीबरोबरच अतिधोकादायक झाडे तोडण्यात येत आहेत.

शहरात गुलमोहराच्या झाडांचे प्रमाण अधिक असून त्यातही मुख्य रस्त्यांवर या झाडांची संख्या लक्षणीय आहे. गुलमोहराची झाडे झपाट्याने वाढतात. हिवाळ्यात व पावसाळ्यामध्ये डेरेदार वृक्षांना लाल फुले येत असल्याने परिसराला सुंदरता प्राप्त होते. त्यामुळेच १९९२ व १९९६च्या पंचवार्षिकमध्ये विकास दाखविण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात गुलमोहराची लागवड झाली होती. परंतू, डेरेदार वृक्षात रुपांतर झालेल्या गुलमोहराच्या झाडांचे वयोमान संपुष्टात आल्याने ती तकलादु झालेली झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. वाऱ्याची मोठी झुळूक आली तरी फांद्या तुटून पडतात. त्यामुळे वाहनांचे नुकसान झाल्याचे प्रकार घडले आहेत. गेल्या दोन महिन्यात गुलमोहराचे झाड पडून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

२६ जून रोजी सातपूरच्या शिवाजीनगर परिसरामध्ये एका दुचाकीस्वाराच्या अंगावर गुलमोहरचा वृक्ष कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. गेल्या महिन्यात देखील अशीच घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील धोकादायक गुलमोहराच्या वृक्षांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. धोकादायक वृक्षाच्या फांद्या छाटणीबरोबरच अतिधोकादायक झाडे तोडण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी गोविंदनगर ते सिटी सेंटर मॉल व पुढे एबीबी सर्कलपर्यंत धोकादायक गुलमोहराचे वृक्ष तोडण्यात आले. आता सातपूर विभागातील धोकादायक गुलमोहर वृक्षाची पाहणी करून छाटण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

गुलशनाबादमधील वृक्षराजी

पाच वर्षांपूर्वी झालेल्या वृक्षगणनेनुसार महापालिका हद्दीत एकुण ४९ लाख झाडे आहेत. त्यात सर्वाधिक २४ झाडे गिरिपुष्प प्रजातिची आहेत. शहरातील एकूण वृक्षराजीच्या तुलनेत ५७ टक्के हे प्रमाण आहे. दुसऱ्या क्रमांकावर शहरात चार लाख २५ हजार ७७१ सुबाभूळ आहेत. त्याखालोखाल निलगिरी, अशोका व गुलमोहर झाडांचे प्रमाण आहे. गुलमोहोर नाव देशी वाटत असले तरी हे झाड मात्र विदेशी प्रजातीचे आहे. चार लाख १९ हजार ८०४ बाभुळ आहे. आंब्याची ९५ हजार ८२०, बोराची ५९ हजार ३३३, बटरफ्लाय पाल्म ३२ हजार ३६९, चंदन १९ हजार ७१७ आहेत. वडाची एक हजार १६० झाडे आहेत. ३१९२ पिंपळ आहेत. उंबराची ३६५८ झाडे आहेत.

गुलमोहोर ही विदेशी प्रजातीची झाडे कमकुवत असतात. वाऱ्यामुळे ती कोसळून जिवित व वित्त हानी होते. त्यामुळे धोकेदायक स्थितीत असलेल्या अशा झाडांचे सर्वेक्षण करण्यात येत असून आवश्यकतेनुसार छाटणी व तोडणी करण्यात येत आहे.

- विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका.

अंगावर झाड पडल्याने दुचाकीस्वार कामगार ठार

सातपूर येथील शिवाजीनगर परिसरातील पाझर तलाव परिसरात बुधवारी (दि. २६) रात्री साडेसातला कामावरून घरी परतणाऱ्या रघुनाथ पवार (३३) या कामगारावर अचानक गुलमोहरचे झाड कोसळून झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

Accident by falling tree
रघुनाथ पवारpudhari news network

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे दिवसभर कंपनीत काम करून बुधवारी (दि. २६) रात्री साडेसातला आपल्या दुचाकी (एमएच १५ इएफ ४३१०)वरून शिवाजीनगरकडून गंगावऱ्हे येथे घरी चालले होते. पाझर तलावाजवळ गुलमोहरचे एक जीर्ण झाड अचानक कोसळले. त्यांची दुचाकी वेगात असल्याने झाड्यांच्या फांद्यांचा मार त्यांना बसून डोक्याला तसेच छातीच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली. यात तुषारचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने शहरातील जीर्ण व धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाने जीर्ण व धोकादायक झाडाबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news