

नाशिक : नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सलग दुसऱ्यांदा एका हाती सत्ता काबीज करणारी भाजप आणि भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेने (शिंदे गट) ने बहुमताच्या जोरावर सहाही प्रभाग समित्यांवर युतीचा झेंडा फडकवला आहे. सहाही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुका गुरुवारी (दि. ३०) बिनविरोध पार पडल्या असून, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, सिडको, सातपूरचे प्रभाग सभापतिपद भाजपकडे तर नाशिकरोड प्रभाग समितीचे सभापतिपद शिंदे गटाच्या पदरात पडले आहे.
सार्वत्रिक निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपने सलग दुसऱ्यांदा नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन केली. केंद्र व राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गटाने देखील महापालिकेतील सत्तेत सहभाग घेतला. महापौर व स्थायी समिती सभापतिपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिंदे गटाला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने बिनशर्त पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीला सत्तापदामध्ये तूर्त स्थान मिळू शकलेले नाही. महापौर-उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या नियुक्त्यांनंतर प्रभाग समित्यांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या निवडणुकांवरही भाजप-शिंदे गटाने वर्चस्व राखत अल्पमतातील विरोधकांना निवडणूक लढविण्यापासूनही परावृत्त केले. अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील स्थायी समितीच्या सभागृहात सहाही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. तत्पूर्वी प्रभाग सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत नाशिक पश्चिमसाठी सुरेश पाटील, पंचवटीसाठी रोहिणी पिंगळे, सातपूरसाठी समाधान देवरे, तर सिडकोसाठी बाळकृष्ण शिरसाट यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने या प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक होती.
माघारीसाठी शिंदे गट उबाठाच्या दारी
नाशिकरोड प्रभाग समिती सभापतिपदासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे रमेश धोंगडे तर उबाठातर्फे प्रमिला मेंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या जागेसाठी निवडणूक अटळ बनली होती. उबाठाचे संपर्कप्रमुख रवींद्र मिलेंकर हे नाशिक दौऱ्यावर असल्याने संख्याबळ नसले तरी उबाठाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अखेर शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते, उपमहापौर विलास शिंदे यांनी उबाठा गटाच्या कार्यालयात जाऊन मिलेंकर यांची भेट घेतली. उबाठाने आपल्या उमेदवाराचा अर्ज माघारी घ्यावा, अशी विनंती शिंदे गटाकडून करण्यात आली. मिलेंकर यांनी शिंदे गटाची विनंती मान्य केली. त्यामुळे मेंद यांनी आपला अर्ज मागे घेत धोंगडे यांच्या सभापतिपदाचा मार्ग मोकळा केला.
नाशिकरोडमधून उबाठाची; पूर्वमधून काँग्रेसची माघार
नाशिक पूर्व सभापतिपदासाठी सर्वप्रथम निवडणूक प्रक्रिया पार पडली. काँग्रेसच्या नाझिया अत्तार यांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात एकमेव अर्ज असलेल्या भाजपच्या मंगला नन्नावरे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध घोषित केले. यानंतर नाशिक पश्चिममधून सुरेश पाटील, पंचवटीतून रोहिणी पिंगळे, सातपूरमधून बाळकृष्ण शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नाशिकरोड प्रभाग सभापती निवडणुकीत शिंदे गटाचे रमेश धोंगडे व उबाठाच्या प्रमिला मेंद यांच्यात सरळ लढत होती. प्रमिला मेंद यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने नाशिकरोड सभापतिपदाची शेवटची निवडणूकही बिनविरोध झाली. सभापतिपदी धोंगडे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
सातपूर: समाधान देवरे (भाजप)
सिडको: बाळकृष्ण शिरसाट (भाजप)
नाशिक पश्चिम: सुरेश पाटील (भाजप)
पंचवटी: रोहिणी पिंगळे (भाजप)
नाशिक पूर्व: मंगला नन्नावरे (भाजप)
नाशिकरोड: रमेश धोंगडे (शिंदे गट)
निकाल:
०५ भाजप
०१ शिवसेना