

नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणूक प्रमुखपदी भाजपतर्फे आमदार प्रा. देवयानी फरांदे तर मालेगाव महापालिका निवडणूकप्रमुखपदी आमदार डॉ. राहुल आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.
नाशिक महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपतर्फे निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयातर्फे नोव्हेंबर महिन्यात नाशिकसाठी निवडणूक प्रमुख म्हणून आ. राहुल ढिकले यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. आता आ. फरांदे यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदेश कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. या पत्रावर प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.
ढिकलेंना 'ते' वक्तव्य भोवले
काही दिवसांपुर्वी एका उद्घाटन कार्यक्रमात आ. राहुल ढिकले यांनी आपल्या भाषणात, आजारी असतानाही माझ्या विरोधात ज्यांनी काम केले, माझी रॅली अडवली. त्यांना अस्मान दाखविल्या शिवाय राहणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांना हे वाक्य भोवल्याची भाजपात चर्चा आहे. नाशिकचे प्रभारी असलेले संकटमोचक गिरीश महाजन यांनी पहिलवान ढिकलेंना राजकारणाच्या आखाड्यात अस्मान दाखविल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देवू. महापालिकेत पुन्हा एकदा भाजपचा महापौर बसवू.
प्रा. देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य.
भाजप तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार जी जबाबदारी दिली जाईल पार पाडू. आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली काम करू.
ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व.