

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थाच्या कामांसोबतच शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्यानंतर महापालिकेने पावसाळा संपेपर्यंत रस्ते खोदकामाला बंदी घातली होती. आता पावसाळा संपत असताना शहरातील विविध विकासकामांसाठी पुन्हा रस्ते खोदण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल), ऑप्टिकल फायबर, बीएसएनएल, महावितरण, स्मार्ट सिटी कंपनीसह आठ यंत्रणांना १५ दिवसांसाठी खोदकामाची परवानगी देण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. २९) संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत कंपन्यांनी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा खोदकामाची परवानगी मागितली. त्यानुसार आयुक्तांनी काही अटींसह परवानगी दिली.
नवरात्रोत्सवापूर्वी खोदकामाची कामे पूर्ण करावीत आणि दसऱ्यापूर्वी रस्ते पूर्ववत करून वाहतुकीसाठी खुले करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करून कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. नाशिक शहरात घरोघरी गॅस कनेक्शन देण्यासाठी 'एमएनजीएल'कडून २०१८ पासून भूमिगत गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.
महापालिका हद्दीत सुमारे ७४० किलोमीटर गॅस पाइपलाइन टाकण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी सुमारे ६४० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सुमारे १०० किलोमीटरचे काम अद्याप प्रलंबित आहे.
पावसाळ्यात रस्ते खोदकामामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांकडून महापालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. सिंहस्थाची कामे आणि विविध यंत्रणांकडून सुरू असलेली रस्ते खुदाई यामुळे शहरातील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. त्यामुळे महापालिकेने पावसाळ्यात खोदकामाला मनाई करून पावसाळा संपेपर्यंत कामे थांबवण्याचे निर्देश दिले होते.
'एमएनजीएल'ला १०० किमी खोदकाम परवानगी:
पावसाळ्यामुळे रखडलेली 'एमएनजीएल'ची कामे आता पुन्हा सुरू होणार आहेत. यापूर्वी महापालिकेने केवळ जोडरस्त्यांवरील कामे करण्याचे निर्देश दिले होते. तसेच 'जीएसआय मॅपिंग'सह संपूर्ण कामांचा आराखडा सादर करण्यास सांगितले होते. 'एमएनजीएल'ने हा आराखडा महापालिकेकडे सादर केल्यानंतर उर्वरित सुमारे १०० किलोमीटरचे खोदकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय ऑप्टिकल फायबर आणि महावितरणकडूनही अतिरिक्त रस्ते खोदकामासाठी परवानगी मागण्यात आली आहे.