Nashik Municipal Corporation | नाशिककरांसाठी मोठी बातमी! मागासवर्गीयांना अडीच लाखांपर्यंत अनुदान मिळणार

Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचा प्रभावी विनियोग करण्यासाठी समाजकल्याण विभागाने तीन वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजना प्रस्तावित केल्या आहेत.
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationPudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेच्या मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचा प्रभावी विनियोग करण्यासाठी समाजकल्याण विभागाने तीन वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजना प्रस्तावित केल्या आहेत.

Nashik Municipal Corporation
Nashik Kumbh Mela 2027 | नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याआधी मोठी मागणी! साधुग्राममधील कोट्यवधींची जागा आखाड्यांना हवी मोफत

यामध्ये मागासवर्गीय महिला, पुरुष संस्था, मंडळे व बचतगटांना स्वयंरोजगारासाठी अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान, विद्यार्थ्यांना संगणक किंवा लॅपटॉप खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य, तर विद्यार्थ्यांना सिटीलिंक बसचा सवलतीचा पास उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे.

शुक्रवारी (दि. २०) होणाऱ्या महासभेच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात मागासवर्गीय घटकांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. या निधीतून प्रामुख्याने रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था आणि उद्यान विकासासारखी कामे केली जातात. मात्र, संबंधित आर्थिक वर्षात विकासकामे पूर्ण न झाल्याने काही निधी अखर्चित राहतो.

त्यामुळे मागासवर्गीय घटकांतील व्यक्तींना थेट लाभ मिळावा आणि राखीव निधीचा योग्य विनियोग व्हावा, या उद्देशाने वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्याचा निर्णय प्रस्तावित करण्यात आला आहे.

पहिल्या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी बँकेकडून स्वयं-सहाय्यता किंवा मायक्रो फायनान्स योजनेतून कर्ज घेतलेल्या मागासवर्गीय महिला, पुरुष संस्था, मंडळे आणि बचतगटांना कर्जाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त अडीच लाख रुपये, यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे.

हा लाभ एकदाच मिळणार आहे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे, वय २१ ते ३५ वर्षे असणे आणि नाशिक महापालिका क्षेत्रात किमान पाच वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे.

१८ ते २५ या वयोगटातील विद्यार्थ्यांना लाभ

दुसऱ्या योजनेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक किंवा लॅपटॉप खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचे प्रस्तावित आहे. वय १८ ते २५ या वयोगटातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, ते महापालिका हद्दीतील रहिवासी असणे आवश्यक आहे.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे. विद्यार्थ्यांनी शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट, जातीचा दाखला तसेच संगणक किंवा लॅपटॉप खरेदीचे कोटेशन आणि बिल सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली अडीच कोटींची कामे विनानिविदा; नाशिक महापालिकेचा निर्णय चर्चेत

विद्यार्थ्यांना महाविद्यालयापर्यंतच पास

तिसऱ्या योजनेत इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणासाठी घरापासून शाळा किंवा महाविद्यालयापर्यंत ये-जा करण्यासाठी सिटीलिंक बसचा सवलतीचा पास उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सात ते २१ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र विद्यार्थ्यांची यादी सिटीलिंककडे पाठवून त्यांना वार्षिक किंवा त्रैमासिक पास दिला जाईल. या पासपोटी होणाऱ्या सवलतीच्या रकमेची प्रतिपूर्ती महापालिकेच्या समाजकल्याण विभागाकडून सिटीलिंकला करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.