Nashik-Mumbai journey | नाशिक-मुंबई आता अडीच तासांत

दळणवळण गतिमान : महाराष्ट्रदिनी समृद्धीचा शेवटचा टप्पा होणार खुला?
नाशिक
महाराष्ट्रदिनी समृद्धीचा शेवटचा टप्पा होणार खुला होणार असल्याने नाशिक-मुंबई हे अंतर अवघ्या अडीच तासांवर येणार आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे

राज्याच्या दळणवळणाला 'समृद्ध' करणारा नागपूर ते मुंबई हा ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग अखेर पूर्ण क्षमतेने खुला होण्याच्या उंबरठ्यावर आहे. या महामार्गाचा अखेरचा नाशिक-मुंबई हा टप्पा महाराष्ट्रदिनी अर्थात १ मे रोजी खुला केला जाण्याची शक्यता असल्याने, नाशिक-मुंबई हे अंतर अवघ्या अडीच तासांवर येणार आहे.

Summary
  • नागपूर ते मुंबई ७०१ किमीचा रस्ता अखेर होणार खुला

  • ७६ किमीचा इगतपुरी ते आमणे अंतिम टप्पाही सेवेत

  • कसारा घाटात ७.८ किमीच्या बोगद्याचे आकर्षण

  • इगतपुरी ते आमणे मार्गावर ११ किमीचे पाच बोगदे

  • नाशिक महामार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने वाहतूक जलद

एमएसआरडीसीने ५५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्चुन ७०१ किमी लांबीचा २४ जिल्ह्यांना जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग उभारून राज्याचे दळणवळण गतिमान केले. आतापर्यंत या महामार्गाचे टप्प्याने लोकार्पण करण्यात आले असून, ६२५ किमी लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता अखेरचा इगतपुरी-आमणे, भिवंडी हा ७६ किमीचा टप्पा पुढील मे महिन्यात खुला केला जाणार आहे. त्याचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्याला होणार असून, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आता नाशिकहून अवघ्या अडीच तासांत गाठता येणार आहे. मुंबई -पुणे -नाशिक या सुवर्ण त्रिकोणात नाशिकला स्थान असले तरी, मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिकचा म्हणावा तसा विकास झाला नाही. यास दळणवळण हे प्रमुख कारण मानले जाते. समृद्धीमुळे नाशिक मुंबईच्या अधिक जवळ जाणार असल्याने, त्याचा मोठा फायदा नाशिकच्या विकासाला होणार असल्याने, अखेरचा टप्पा लवकर खुला केला जावा, अशी अपेक्षा नाशिकच्या व्यापार-उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

सर्वाधिक लांबी आणि रुंदीचा बोगदा

इगतपुरी ते आमणे या उर्वरित टप्प्यातील ७६ किमी लांबी नाशिक व ठाणे जिल्ह्यात येते. या टप्प्यामध्ये एकूण पाच बोगदे असून, या बोगद्यांची एकूण लांबी ११ किमी आहे. त्यातील पॅकेज १४ (इगतपुरी) येथील दुतर्फा बोगदा ७.८ किमी लांबीचा असून, हा देशातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा (१७.६१ मीटर) बोगदा आहे. या बोगद्याची उंची ९.१२ मीटर आहे. या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येते.

कसारा घाटाला पर्यायी मार्ग

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक जलद होणार आहे. त्याचा फायदा नाशिकच्या दळणवळणाला होणार आहे.

टप्प्याटप्प्याने समृद्धी सेवेत

  • नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते.

  • दुसऱ्या टप्प्याचे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (कोकणमठाण) ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर २० इंटरचेंज दरम्यान एकूण ८० किमी लांबीचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

  • समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरजचेंज इगतपुरीपर्यंतच्या २५ किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण ४ मार्च २०२४ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

सध्या समृद्धीला जोडण्यासाठी घोटी भावली डॅम येथून मार्ग उपलब्ध आहे. हा मार्ग वाडीवऱ्हे येथून जोडावा, अशी आमची मागणी असून, त्यास तत्वता: मंजुरी दिली आहे. वाढवण बंदराकरिता समृद्दीला जोडणारा हाच मार्ग असून, त्यासही तत्वता: मान्यता देण्यात आली आहे. समृद्धीमुळे नाशिक-मुंबई अंतर कमी होणार आहे.

धनंजय बेळे, माजी अध्यक्ष, निमा, नाशिक.

समृद्धीचा अखेरचा टप्पा खुला होणार असल्याने, निर्यातीला तसेच टुरिझमला मोठा फायदा होईल. शेतमाल वेळेवर पोहोचविणे शक्य होणार असल्याने, शेतकर्‍यांना त्याचा दिलासा मिळेल. मात्र, घोटी टोलनाक्याच्या समोरून समृद्धी कनेक्ट होता येणार असल्याने, घोटीचा 120 रुपये टोलनाका भरावा लागेल, येथे एकेरी टोल आकारण्याची गरज आहे.

संजय सोनवणेे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news