

सिडको : परिसरातील मोरवाडी स्मशानभूमी येथे गुरुवारी सायंकाळी वीजपुरवठा बंद असल्याने नागरिकांना अक्षरशः अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. परिसरात सर्वत्र दिवे सुरू असताना स्मशानभूमीत मात्र अंधाराचे साम्राज्य असल्याने मनपा विद्युत विभागाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मोरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात विधी पार पाडावे लागले. त्यामुळे मोठी गैरसोय झाली. विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना अंधारामुळे अधिक त्रास सहन करावा लागला. स्मशानभूमीसारख्या अत्यावश्यक ठिकाणी मूलभूत सुविधा नसल्याने उपस्थितांमध्ये संतापाचे वातावरण होते.
सिडको परिसरात रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत सुरू असताना स्मशानभूमीतच दिवे बंद असणे हे गंभीर दुर्लक्ष असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अनेक वेळा तक्रारी करूनही समस्या कायम असल्याचा आरोपही करण्यात आला.
स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात येथे वारंवार वीजपुरवठ्याच्या समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ वीज व्यवस्था सुरळीत करावी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मनपा सिडको विद्युत विभागाचे उपअभियंता यांच्याकडे दोन विभागाची जबबदारी आहे . मनपा आयुक्त यांनी सिडको साठी स्वतंत्र उपअभियंता द्यावा
योगेश गांगर्डे . सामाजिक कार्यकर्ता