

देवळाली कॅम्प (नाशिक) : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या नियोजनाच्या अनुषंगाने नाशिक येथे रेल्वे व स्थानिक प्रशासनाच्या प्राथमिक समन्वय बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळातील गर्दी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा यावर एकत्रित उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, भुसावळ रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इति पांडेय, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान, राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ प्रस्तावित मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हबबाबत सादरीकरण करण्यात आले. हा हब रेल्वे, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचे प्रभावी समन्वय साधण्यासाठी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातील प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ व सुरक्षित करणे शक्य होणार आहे.
बैठकीनंतर नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि देवळाली या प्रमुख रेल्वे स्थानकांची संयुक्त पाहणी करण्यात आली. यावेळी विद्यमान सुविधा तपासून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या अतिरिक्त सुविधा निश्चित करण्यात आल्या.
स्थानक उन्नतीकरण : नाशिक रोड आणि देवळाली स्थानकांचे सर्वांगीण विकास आराखडे, वाढीव प्रवासी संख्येच्या व्यवस्थापनासाठी तयार करण्यात येणार आहे.
प्लॅटफॉर्म व क्षमतेत वाढ : ओढा स्थानकावर विशेष आणि वळविलेल्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म वाढविण्यात येणार असून क्षमता सुधारण्यात येणार आहे.
नवीन पिट लाईन व स्थिरता लाईन : देवळाली कॅम्प स्थानकावर देखभाल सुविधा वाढविण्यासाठी नवीन पिट लाईन व स्थिरता लाईन निर्माण करण्याची योजना आहे.
बस टर्मिनल व होल्डिंग क्षेत्र : नाशिक डेपो येथे सार्वजनिक वाहतुकीसाठी विशेष टर्मिनल आणि मोठ्या यात्रेकरू गटांसाठी थांबा व्यवस्थेची उभारणीचे नियोजन आहे.
खेरवाडी स्थानक विकास : नाशिककडे जाण्यासाठी एक पर्यायी प्रवेशबिंदू म्हणून निफाड तालुक्यातील खेरवाडी स्थानकाचा विकास केला जाईल. यासाठी भू-संपादन, पार्किंग, स्वच्छता, आपत्कालीन सेवा आणि निवास व्यवस्थेसह आवश्यक पायाभूत सुविधा तयार केल्या जातील.