नाशिक : ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा हाती घेतल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त विधान करत ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला होता. 'मराठी लोक कुणाची भाकर खाता, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगता', असे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे दुबेंनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा न्यायालयीन लढाईची मनसैनिकांनी तयारी केली होती. दुबेंनी माफी न मागितल्याने मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात दुर्वेविरोधात याचिका दाखल केली आहे.
हिंदीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमधील एका परप्रांतीय दकानदाराने मराठी बोलणार नाही, असे म्हटल्याने हात उचलला होता. यावरून निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला होता. मराठी लोक कुणाची भाकर खातायत, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय, असे दुबे म्हणाले होते.
तसेच मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा, असे म्हणत दुबेंनी मराठी लोकांना डिवचले होते. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का, सगळे उद्योग गुजरातकडे येतायत, असेही दुबेंनी म्हटले होते. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ. महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारू, असे वादग्रस्त विधान केले होते. यावरून मनसेचे शहराध्यक्ष कोंबडे यांनी दुबे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. याबाबतची नोटीसही दुबे यांना पाठविली होती. मात्र या नोटीसीला उत्तर न दिल्याने मनसेचे शहराध्यक्ष कोंबडे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात दुबेंविरोधात याचिका दाखल केली आहे. आता दुबेंना सुनावणी दरम्यान नाशिक न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे हा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.
खासदार दुबे सातत्याने मराठी माणसांविरोधात वक्तव्य करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात ते गरळ ओकत आहेत. दुबेंनी माफी मागावी अशी मागणी केली होती. मात्र मुजोर दुबेंनी माफी मागितली नाही. त्यामुळे आता याविरोधात नाशिक न्यायालयात याचिका दाखल केली असून दुबे नाशिकला आल्यानंतर घडा शिकवू.
सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे -