Nashik MNS | मनसेचा नाशिक शहरातील विधानसभेच्या तिन्ही जागांवर डोळा

महाविकास आघाडी, महायुतीचे गणित बिघडवणार
Raj Thackeray
मनसेचा नाशिक शहरातील तिन्ही जागांवर डोळाFile photo

नाशिक : गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने आगामी विधानसभेत कोणाशीही युती, आघाडी न करता, स्वबळावर २२५ ते २५० जागा लढविण्याचा निर्धार केल्यामुळे, राज्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. कधीकाळी शहरातील तिन्ही मतदार काबीज केलेल्या मनसेचा पुन्हा एकदा या तिन्ही मतदारसंघांवर डोळा असल्याने, महाविकास आघाडी आणि महायुतीचे विजयाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देताना, काहीही करून मनसे पदाधिकाऱ्यांना सत्तेत सहभागी करून घेणार असल्याचा शब्द दिला. त्यामुळे राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक कामाला लागले आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे स्वबळावर १३ आमदार निवडून आले होते. त्यापैकी तीन आमदार नाशिक शहरातील होते. त्यावेळी नाशिक पूर्वमधून उत्तमराव ढिकले, नाशिक मध्यमधून वसंत गिते, तर नाशिक पश्चिममधून नितीन भोसले यांनी दणदणीत विजय मिळविला होता. सध्या या तिन्ही आमदारांनी मनसेची साथ सोडली असली, तरी या मतदारसंघातील मतांची आकडेवारी लक्षात घेता, येथील मतदार मनसे विचारसरणीला मानणारा असल्याचा विश्वास मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे या मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्धार मनसेचा आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी शहरासह जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांतील मनसेची स्थिती जाणून घेण्यासाठी त्रयस्थ संस्थेला सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविली होती. या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात उमेदवार देता येऊ शकतात, याबाबतचा सर्व्हे केला गेला. आता हा अहवाल राज ठाकरे यांना सादर केला जाणार असून, त्यानंतर उमेदवारांच्या नावांवर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे, पक्षातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Raj Thackeray
K.V.N.Naik Sanstha Election | केव्हीएन नाईक शिक्षण संस्थेसाठी आज मतदान

मनसेचा विधानसभेतील प्रवास

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी १४३ उमेदवार उभे केले होते. पहिल्याच दमात त्यांनी १३ आमदार निवडून आणले. त्यांनी ५.७१ टक्के मते मिळविली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत २१९ उमेदवार रिंगणात उतरविले होते. पण त्यावेळी त्यांचा एकच आमदार निवडून आला. त्यावेळी त्यांना ३.१५ टक्के मते घेता आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १०१ उमेदवार उतरविले. त्यावेळीही एकच आमदार निवडून आला. मतदानाची टक्केवारी थेट २.२५ टक्क्यांवर आली. यंदा मनसे २०० ते २५० जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे.

२००९ मध्ये दमदार कामगिरी

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने दमदार कामगिरी केली होती. नाशिक पूर्वमधून ॲड. उत्तमराव ढिकले यांनी तब्बल ४७ हजार ९२४ इतकी (३४.३९ टक्के) मते घेतली होती. त्यावेळी भाजपचे बाळासाहेब सानप (२९ हजार १८९) दुसऱ्या, तर काँग्रेसचे राजाराम पानगव्हाणे (२० हजार १८२) तिसऱ्या स्थानी होते. नाशिक मध्यमधून वसंत गिते यांनी ६२ हजार १६७ (४६.४२ टक्के) मते मिळविली होती. त्यावेळी काँग्रेसच्या शोभा बच्छाव (३० हजार ९९८) दुसऱ्या स्थानी, तर शिवसेनेचे सुनील बागूल (२४ हजार ७८४) तिसऱ्या स्थानी होते. नाशिक पश्चिममधून नितीन भोसले यांनी ५२ हजार ८५५ (३५.०३ टक्के) मते घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना महाले (२८ हजार ११७) दुसऱ्या, तर अपक्ष म्हणून दशरथ पाटील (१९ हजार ७३४) तिसऱ्या स्थानी होते.

Raj Thackeray
विधानसभेच्या दोनशे जागा मनसे लढवणार

लोकसभेतही कडवी झुंज

२००९ मधील लोकसभा निवडणुकीत मनसेने दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला कडवी झुंज दिली होती. राष्ट्रवादीचे समीर भुजबळ हे ३६.३ टक्के मते घेऊन विजयी झाले होते. परंतु, मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी मिळवलेली ३३ टक्के मते सर्वांना चकीत करणारी होती. २०१४ मध्ये मात्र पक्षाचा आलेख घसरला. मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. मतांची टक्केवारी ६.७ टक्क्यांपर्यंत घसरली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news