

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर महायुतीत निर्माण झालेली नाराजी मतदानाच्या दिवशीही कायम असल्याचे चित्र दिसले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हस्तक्षेप करीत नाराजांना थेट दमच भरला.
'हाय व्होल्टेज' ड्राम्यानंतर नगरसेवकांचा ताफा ठाण्याहून नाशिकच्या दिशेने रवाना झाला. या संपूर्ण घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि त्याभोवती रंगलेले राजकीय नाट्य शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे स्पष्ट बहुमतापेक्षा अधिक मतांचे संख्याबळ असले, तरी गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे या अपक्ष उमेदवारांच्या उपस्थितीमुळे संभाव्य क्रॉस वोटिंगची भीती कायम होती.
याच पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना चार दिवस ठाण्यातील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. या काळात नगरसेवकांसह त्यांच्या कुटुंबीयांची आणि कार्यकर्त्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली होती. नाराजी दूर करण्यासाठी सातत्याने संवाद साधला जात असला, तरी मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत असंतोष पूर्णपणे कमी झाल्याचे चित्र दिसत नव्हते.
मतदानाच्या पूर्वसंध्येला उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रिसॉर्टवर जाऊन मतदारांशी संवाद साधला. महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी एकजुटीचे आवाहन केल्यानंतर सर्व काही सुरळीत असल्याचे वातावरण निर्माण झाले. मात्र मतदानाच्या दिवशी पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला.
दगाफटका झाल्यास त्याचे परिणाम महायुतीवर !
दगाफटका झाल्यास त्याचे परिणाम थेट महायुतीवर होतील, असा स्पष्ट संदेश देत शिंदे यांनी मतदारांची समजूत काढल्याचे सांगितले जाते. त्यांच्या चर्चेनंतर वातावरणातील तणाव कमी झाल्याचे तसेच अनेक नाराज चेहरे प्रसन्न झाल्याचे बोलले जात आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महायुतीतील वरिष्ठ मंत्र्यांनाही नाशिकमध्ये तळ ठोकावा लागला.
आता निकालाकडे लक्ष
नाशिक मतदारसंघात महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असले, तरी अपक्ष उमेदवारांमुळे शेवटच्या क्षणापर्यंत साशंकता कायम राहिली. त्यामुळे मतपेटीतून बाहेर पडणारा निकाल महायुतीच्या नियोजनाला कितपत यश मिळवून देतो आणि नाराज मतदारांनी नेमकी कोणती भूमिका घेतली, याचा फैसला आता या निवडणुकीच्या सोमवार, २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच लागणार आहे.