Nashik | मंत्री भुजबळ, भुसे, कोकाटे, झिरवाळ आज विद्यार्थ्यांच्या भेटीला

लोकप्रतिनिधी अन् अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाजणार शाळांची घंटा; शिक्षण विभागाकडून प्रवेशोत्सवाची तयारी
नाशिक
नूतन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असल्याने शाळेची घंटा स्वच्छ करताना कर्मचारी.(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : उन्हाळी सुटीनंतर नूतन शैक्षणिक वर्षाला सोमवारी (दि. १६) सुरुवात होत आहे. यानिमित्त शाळा प्रवेशोत्सवांतर्गत पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

Summary

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ हे जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. याशिवाय खासदार, आमदारांसह वरिष्ठ अधिकारी या प्रवेशोत्सवात सहभागी होणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने कोणत्या शाळेत कोणते मान्यवर उपस्थित राहतील, याचे नियोजन पूर्ण केले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथ.) नितीन बच्छाव यांनी दिली.

उन्हाळी सुटीनंतर सोमवारपासून प्राथमिक शाळा पुन्हा गजबजणार आहेत. मागील काही वर्षांपासून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत आहे. त्यानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात बैलगाडीसह इतर वाहनांतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली जाणार आहे. या उपक्रमाला लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार शिक्षणमंत्री भुसे हे बागलाण तालुक्यातील तुंगणदिगर प्राथमिक शाळेत, मंत्री झिरवाळ इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव आदिवासी आश्रमशाळा, मंत्री कोकाटे इगतपुरीतील जि. प. शाळेत उपस्थित राहतील. यांच्यासह विधानसभा, विधान परिषदेच्या आमदारांनाही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आमंत्रित केले आहे. याशिवाय विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध विभागांतील अधिकारीदेखील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये जाणार आहेत.

पहिल्याच दिवशी गणवेश, बूट व मोजे

जिल्ह्यात समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या २ लाख ५३ हजार ५५७ कोटी ३८ लाख, तर बूट-मोज्यांसाठी ४ कोटींचे अनुदान शाळानिहाय वितरित झाले आहे. गतवर्षी गणवेश वाटपात झालेला गोंधळ लक्षात घेऊन यंदा शासनाने शालेय व्यवस्थापन समितीमार्फत खरेदी व वाटपाचे नियोजन केले आहे. जिल्हा परिषदेच्या ३,२७५ शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना तसेच 'पीएम श्री' शाळांतील ७,४५२ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

28.56 लाख पाठ्यपुस्तकांचे वितरण

राज्य शासनाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत सुरू केलेल्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेतून, पहिली ते आठवीच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके दिली जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ४,२३८ शाळांमधील ४ लाख ८८ हजार ३२१ विद्यार्थ्यांसाठी २८ लाख ५७ हजार ६३३ पुस्तके मागवण्यात आली होती. त्यापैकी १५ जूनपर्यंत २८ लाख ५६ हजार ३७५ पुस्तके वितरित झाली असून, उर्वरित १,२५८ प्रती सोमवारपर्यंत वितरित होतील असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

तालुकानिहाय मोफत पाठपुस्तके

नाशिक - २,६९,३८०, सिन्नर -२,१५,८३२, दिंडोरी -२,४०,४१०, इगतपुरी -१,८४,४३९, निफाड - २,६८,३०४, पेठ -१,१६,९३६, चांदवड -१,५४,३०८, नांदगाव - २,११,३९०, कळवण - १,५६,८८६, बागलाण -२,६९,३८०, येवला - १,६४,००६, मालेगाव - ३,१२,७२३, सुरगाणा -१,५७,८३२, देवळा - ९३,५३४, त्र्यंबकेश्वर - १,५८,७८६, एकूण - २८,५६,३७५.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव होणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश, मोजे, बूट तसेच पाठपुस्तके देण्याचे नियोजन केले आहे. याबाबत रविवारी गट शिक्षणाधिकारी यांची व्हीसीद्वारे बैठक घेतली.

नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news