

नाशिक : आठ दिवसांपूर्वीच महसूल व वन विभागाकडून नियुक्तीचे आदेश प्राप्त कणाऱ्या अंबड (जालना) येथील उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांचे एमआयडीसी प्रादेशिक अधिकारीपद औट घटकेचे ठरले आहे. जालना जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांच्या याचिकेवर शुक्रवारी (दि.१८) छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणने (मॅट) पाटील यांना पूर्वपदी रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रादेशिक अधिकारी पदाचा गुंता आणखीनच वाढला आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारीपदाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. गेल्या ३१ जुलै रोजी प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांची पनवेल भूसंपादन विभागात बदली झाल्यानंतर ६ आॅगस्ट रोजी पारनेरचे (नगर) प्रांताधिकारी गणेश राठोड यांची प्रादेशिक अधिकारीपदी नियुक्ती केली होती. मात्र, नियुक्तीनंतरही त्यांना तब्बल दोन महिने प्रतिक्षेत ठेवल्यानंतर गेल्या शुक्रवारी (दि.११) दिपक पाटील यांची प्रादेशिक अधिकारीपदी नियुक्ती केल्याचे वन व महसूल विभागाने आदेश काढले होते. तर राठोड यांच्या नियुक्ती आदेशात अंशत: बदल करून शिर्डी साईबाबा संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली केली होती. राठोड यांनी पाटील यांच्या नियुक्तीस 'मॅट'मध्ये आव्हान दिले होते. दुसरीकडे पाटील यांच्या नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या अंबड (जालना) उपविभागीय अधिकारीपदी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांची नियुक्ती केल्याने, त्यांनीही या नियुक्तीला 'मॅट'मध्ये आव्हान दिले होते. दरम्यान, शुक्रवारी (दि.१८) त्यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली असून, त्यात दिपक पाटील यांना पूर्वपदी तत्काळ रूजू होण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, 'मॅट'च्या या निर्णयामुळे गणेश राठोड यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असला तरी, दिपक पाटील यांच्याप्रमाणेच त्यांच्याकडेही निवडणूक विषयक कामांची जबाबदारी असल्याने त्यांच्या नियुक्तीबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.
राठोड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी (दि.१७) मुंबई 'मॅट'मध्ये सुनावणी पार पडली. सुनावणीत शासनाला बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र शासनाकडून या प्रकरणाच्या मूळ नस्ती सादर न केल्याने त्यातील शेरे व अन्य बाबी न्यायालयाला पडताळता आल्या नाहीत. परिणामी सोमवारी (दि.२१) सुनावणी होणार असून, मूळ नस्तींतील शेरे, बदलीसाठीचे निकष व अन्य बाबींच्या पडताळणीनंतरच अंतिम निर्णय दिला जाणार आहे. हा निर्णय सोमवारी अपेक्षित असल्याचे अधिकारी वर्तुळात चर्चा आहे.
प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांची पनवेल सिडको विभागात मुख्य भूमापन अधिकारीपदावर नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या जागी क्षेत्र व्यवस्थापक महेंद्र साळी यांची प्रभारी प्रादेशिक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या एमआयडीसीचा प्रभारी कार्यभार असून, तत्काळ सक्षम आणि उद्योग विकासाचे उद्दिष्ट असलेल्या अधिकाऱ्यांची याठिकाणी प्रशासनाने नियुक्ती करावी, असा सूर उद्योग वर्तुळात व्यक्त केला जात आहे.