

नाशिक : गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक आणि अहिल्यानगर एमआयडीसी प्रादेशिक अधिकारीपदाचा निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. नाशिक एमआयडीसी प्रादेशिक अधिकारीपदी दीपक पाटील यांची, तर गणेश राठोड यांची अहिल्यानगर येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. महसूल व वनविभागाने शुक्रवारी (दि.२१) याबाबतचे आदेश काढले आहेत.
३१ जुलै २०२४ रोजी नितीन गवळी यांची बदली झाल्यापासून, नाशिक आणि स्वतंत्र कार्यभार केलेल्या अहिल्यानगर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारीपद रिक्त होते. गवळी यांच्या बदलीनंतर ६ ऑगस्ट रोजी गणेश राठोड यांची नाशिक प्रादेशिक अधिकारीपदी नियुक्ती केली होती. मात्र, त्यांची नियुक्ती ऐनवेळी रद्द ठरवित, दीपक पाटील यांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश काढले गेल्याने राठोड यांनी मुंबई मॅटमध्ये धाव घेतली. मागील काही काळापासून मॅटमध्ये याप्रकरणी सुनावणी सुरू होती. गेल्या ६ फेब्रुवारी रोजी मॅटने दोन अधिकाऱ्यांची नाशिक आणि अहिल्यानगर येथे नियुक्ती केली जावी. तसेच याबाबतचा अहवाल उद्योग विभागाने सादर करावा, असे आदेश मॅटने दिले होते. त्यानुसार, महसूल व वनविभागाने दीपक पाटील यांची नाशिकमध्ये, तर गणेश राठोड यांची अहिल्यानगर एमआयडीसी प्रादेशिक अधिकारीपदी नियुक्तीचे शुक्रवारी (दि.२१) आदेश काढले आहेत.
दरम्यान, दोन्ही अधिकारी सोमवारी (दि.२४) मुंबई उद्योग विभागात रुजू होणार असून, मंगळवारी (दि.२५) कार्यभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक आणि अहिल्यानगर या दोन्ही एमआयडीसींना अधिकारीच नसल्याने उद्योगांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. अशात अधिकारी नियुक्तीमुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा उद्योग वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
नाशिक एमआयडीसी प्रादेशिक अधिकारीपदाचा वाद मॅटमध्ये पोहोचल्याने, या पदी नेमकी कोणाची वर्णी लागणार याची उद्योग वर्तुळात उत्सुकता होती. दीपक पाटील यांची प्रतिनियुक्ती केली गेल्याने, यावर आता पडदा पडला आहे. मात्र, पाटील यांच्या नियुक्तीवर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा प्रभाव असल्याची चर्चा आहे. याशिवाय उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही पाटील यांच्या नियुक्तीला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्ह्यातील विविध भागांतील नव्या आणि जुन्या एमआयडीसीसाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली जात आहे. काही भागांत शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्याने, भूसंपादनाचे मोठे आव्हान दीपक पाटील यांच्यासमोर असणार आहे. याशिवाय नाशिकमध्ये मोठा उद्योग आणवा, अशीही नाशिककरांची अपेक्षा त्यांच्याकडून असणार आहे. एमआयडीसीत भूखंडमाफियांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.