

नाशिक : नाशिकमधील एमडी प्रकरणाचा मुद्दा थेट संसदेत पोहोचला असून या प्रकरणातील दोषींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
अलीकडील काही महिन्यात नाशिकमध्ये सक्रिय असलेल्या टोळ्या, आंतरराज्य पातळीवरील औषध तस्करीचे नेटवर्क, तरुण पिढीला लक्ष्य करणारी एमडी आणि सिंथेटिक ड्रग्जच्या घातक साखळीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल खासदार वाजे यांनी प्रश्न उपस्थित करत संसदेचे लक्ष वेधले. एमडीच्या विळख्यातून युवा पिढीला वाचवण्यासाठी तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे खासदार वाजे यांनी म्हटले आहे.
नाशिकसारख्या सांस्कृतिक आणि औद्योगिक शहरात एमडीसारख्या ड्रग्सची लागण वेगाने पसरत आहे. युवकांना या चक्रातून बाहेर काढण्यासाठी केंद्राने तत्काळ व्यापक आणि बहुआयामी कारवाई करणे अत्यावश्यक आहे. केवळ कायद्याची अंमलबजावणी नव्हे तर जनजागृती, शैक्षणिक पातळीवर प्रतिबंधात्मक मोहिमा, पुनर्वसन व्यवस्था बळकट करण्याची केंद्र सरकारकडून विशेष मागणी केली.
नाशिकसह देशातील असंख्य शहरांना किंबहुना ग्रामीण भागातही काही प्रमाणात ड्रग्सने विळखा घातला आहे. एक पिढी यातून उद्ध्वस्त होत आहे. हे देशावर आलेले संकट समजून देशव्यापी आणि ठोस उपाययोजना व्हाव्यात.
राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
सिंथेटिक ड्रग्जचा नवा धोका
गतवर्षी गुजरात एटीएसने भिवंडीत नोंदवलेल्या मेफेड्रॉनच्या तब्बल ७९० किलोहून अधिक जप्ती ही घटना संपूर्ण देशाला हादरवणारी ठरली होती. या प्रकारच्या सिंडिकेटचे परिणाम नाशिकपर्यंत पोहोचत असल्याचे खासदार वाजे यांनी नमूद केले. युवकांना लक्ष्य करणाऱ्या या नेटवर्कमुळे शहरातील शाळा, महाविद्यालय परिसर, औद्योगिक वसाहती तसेच महापालिका हद्दीलगतच्या गावांत ड्रग्सचे नवे मार्ग सक्रिय झाल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.