

नाशिक : वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नाशिकमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढ करण्यात आली आहे.
नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) या वाढीला मंजुरी दिल्याने महाविद्यालयाची प्रवेशक्षमता आता ५० वरून थेट १०० वर पोहोचली आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय पदव्युत्तर एमडी आणि एमएस अभ्यासक्रमाच्या तीन नवीन जागांचीही भर पडली आहे.
नाशिकचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सध्या न्यू बिटको रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाच्या कार्यरत आहे. माध्यमातून महाविद्यालयासाठी मेरी परिसरात स्वतंत्र इमारत आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासही शासनाने मान्यता दिली आहे.
वाढत्या विद्यार्थीसंख्येच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे. नवीन जागांमुळे प्रवेशाची संधी वाढणार असली, तरी त्यानुसार अध्यापक, रुग्णालयीन सुविधा आणि प्रशिक्षण व्यवस्थाही सक्षम करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या जागांमध्येही यंदा मोठी वाढ झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यात एमडी आणि एमएस अभ्यासक्रमांच्या तब्बल १ हजार ६६ नवीन जागा वाढल्या आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण पदव्युत्तर वैद्यकीय जागांची संख्या ७ हजार ६१५ झाली आहे.
यामध्ये २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ७२० जागांची, तर खासगी आणि डीम्ड विद्यापीठांच्या महाविद्यालयांमध्ये ३४६ जागांची वाढ झाली आहे. या कामगिरीमुळे वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाच्या जागांमध्ये महाराष्ट्र देशात कर्नाटकनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे