

मालेगाव : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेशप्रक्रियेचा श्रीगणेशा झाला आहे. सीईटी सेलतर्फे एमबीए / एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या सीईटी परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पात्रताधारक विद्यार्थ्यांना दि. 25 जानेवारीपर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करता येईल, अशी माहिती येथील डॉ. बी. व्ही. हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सुभाष जाधव यांनी दिली.
अभ्यासक्रम प्रवेशासाठी एमएएच - एमबीए / एमएमएस सीईटी 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम वर्षाला सीईटी परीक्षेच्या कामगिरीच्या आधारे प्रवेश दिला जाईल. यापूर्वी सीईटी सेलने विविध सीईटी परीक्षांच्या संभाव्य तारखांची घोषणा केली होती. तसेच, अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांचा अभ्यासक्रम काय असेल, त्याचाही तपशील जारी केला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा कायम होती. एमबीएला प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. बुधवार (दि. 25) पासून या नोंदणीला सुरुवात झाली आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना दि. 25 जानेवारीपर्यंत संकेतस्थळावर परीक्षेसाठी अर्ज भरता येईल. परीक्षा अर्ज भरून ऑनलाइन पद्धतीने शुल्क अदा केलेले अर्ज पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
एमबीएची सीईटी परीक्षा राज्य तसेच राज्याबाहेर परीक्षा केंद्रांवर घेतली जाते. सीईटी सेलने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार दि. 17 ते 19 मार्च या कालावधीत सकाळ आणि दुपार सत्रात ही सीईटी परीक्षा संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) घेतली जाणार आहे. नोंदणीकृत विद्यार्थ्यांंना परीक्षेपूर्वी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षेची तारीख, वेळ व इतर महत्त्वाचा तपशील उपलब्ध होणार आहे. प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी डॉ. बी. व्ही. हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर येथे संपर्क साधावा. महाविद्यालयात प्रवेशासाठी माहिती व सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरून घेणे, प्रवेश परीक्षेची पूर्वतयारी आदींबाबत मार्गदर्शन केले जात आहे.