

मनमाड (नाशिक) : काही राजकीय मंडळींनी राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते असा खोटा इतिहास सांगून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. गैरसमजातून अनेकवेळा हिंदू- मुस्लिमांमध्ये दंगलीदेखील झाल्या आहेत. मात्र, जर शिवराय मुस्लिमांचे शत्रू असते तर त्यांनी त्यांच्या सैन्यात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मुस्लीम सरदारांकडे दिल्या नसत्या. त्यामुळे शिवराय कोणत्याही जात- धर्माच्या विरोधात नव्हते. त्यांचा लढा अन्याय- अत्याचाराविरोधात होता असे प्रतिपादन शिवव्याख्याते सुभान शेख यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सप्ताहानिमित्त फुले- शाहू- आंबेडकर मुस्लीम विचार मंचतर्फे एकात्मता चौकात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. मंचावर राजेंद्र पगारे, अहमद बेग मिर्झा, फिरोज शेख, सादिक तांबोळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुभान शेख यांनी ऐतिहासिक दाखले देताना सांगितले की, आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सुटका करण्यासाठी मदारी मेहतर याने मोलाची भूमिका बजावली. त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गद्दारी केली असती तर त्याला किती खोके मिळाले असते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळेच आज मी कुराण शरीफ मधील उर्दू श्लोकांचे तुम्हाला मराठीत अनुवादन करून सांगत आहे. कारण तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी कुराणाचे मराठी भाषेत रूपांतर करण्यासाठी २५ हजार रुपये दिले होते. तेव्हा त्यांनी भेदभाव केला नाही, तर तुम्ही- आम्ही भेदभाव करणारे कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी भाजप शहराध्यक्ष संदीप नरवाडे, युवा उद्योजक उमेश लालवानी, माजी नगरसेवक अमिन पटेल, पवन रॉय, संजय कटारे, नगर रचना अभियंता अझहर शेख, हाजी शफी शेख, प्रदीप गायकवाड, सतीश केदारे, गणेश हडपे, सलमान आत्तार, सूरज अरोरा आदी उपस्थित होते. फिरोज शेख यांनी प्रास्ताविक केले, तर प्राध्यापक विनोद अहिरे यांनी स्वर संबोधी हा शाहीर जलसा सादर करून उपस्थितीना मंत्रमुग्ध केले. विलास अहिरे यांनी सूत्रसंचालन, तर शकूर शेख, सद्दाम आतार, जावेद शेख, इस्माईल पठाण, जाकिर पठाण, अमीन शेख यांच्यासह इतर कार्यकर्त्यानी आयोजन केले.
यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा कुलवाडी भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात अनिल निकाळे (शिक्षक), रामदास पगारे (कामगार), शरद बहोत (सामाजिक), मुस्ताक शेख (क्रीडा) यांचा गौरविण्यात आले.