Vasantdada Sugar Factory Theft: वसंतदादा सहकारी साखर कारखान्यात चोरी करताना एकास रंगेहाथ पकडले

दोघे फरार; विठेवाडी येथील घटना
Vasantdada Sugar Factory
Vasantdada Sugar FactoryPudhari
Published on
Updated on

देवळा : विठेवाडी (ता. देवळा) येथील गेल्या साडेतीन वर्षांपासून बंद असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्यातून शुक्रवार, दिनांक २९ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक वेल्डिंग मशीनची चोरी करताना सुरक्षारक्षकांनी एका चोराला रंगेहाथ पकडले. मात्र, त्याचे इतर दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

कधीकाळी कसमादे पट्ट्याचे वैभव असलेला वसाका कारखाना सध्या गैरव्यवस्थापनामुळे कर्जाच्या खाईत सापडला असून गेल्या साडेतीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे कारखाना परिसरात नेहमीच शुकशुकाट असतो. अत्यंत तोकड्या सुरक्षा यंत्रणेचा फायदा घेत शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास काही भामट्यांनी कारखान्याच्या मशिनरी विभागातून इलेक्ट्रिक वेल्डिंग मशीन चोरण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान, तेथे पेट्रोलिंग करणारे सुरक्षारक्षक कैलास निकम यांना लोखंडाचा आवाज आल्याने त्यांनी तातडीने आत जाऊन पाहिले. तिथे तिघे जण चोरी करत असल्याचे दिसताच निकम यांनी त्यांचा पाठलाग केला. या झटापटीत दोघे जण पळून गेले, तर एकाला पकडण्यात सुरक्षारक्षकांना यश आले. किशोर भाऊसाहेब पवार (वय ३०, रा. लोहोणेर, ता. देवळा) याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर गणेश साहेबराव गांगुर्डे (रा. लोहोणेर) आणि सागर दादाजी पवार (रा. विठेवाडी, ता. देवळा) हे दोघे फरार आहेत.

घटना घडताच देवळा पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व संशयित आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. फरार दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.

कसमादेचे वैभव असलेला वसाका कारखाना बंद असल्याने येथे चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यापूर्वी चोरट्यांनी वेल्डिंग मशिन्स, विद्युत मोटारी फोडून त्यातील महागड्या वायर चोरल्या आहेत. काही दिवसांपूर्वी चोरांनी थेट १७ केव्हीएचे जनित्र (ट्रान्सफॉर्मर) खोलून त्यातील हजारो लीटर किमतीचे ऑईल पाईपच्या साहाय्याने चोरून नेले होते. आता तर भिंतींना भगदाड पाडून चोऱ्या केल्या जात आहेत. 'वसाका'चे अवसायक आणि पोलीस प्रशासनाने येथे पुरेशा प्रमाणात बंदोबस्त तैनात करून कारखान्याच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे रक्षण करणे गरजेचे आहे."
कुबेर जाधव (समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news