

मालेगाव (नाशिक) : शहरातील गोल्डननगर भागातील शकील अहमद अब्दुल सत्तार (38) या नशेखोर तरुणाने वैफल्यातून कटरने गळा चिरून जीवनयात्रा संपवली.
रविवारी (दि. 14) रात्री साडेदहाच्या सुमारास मोसमपूल भागातील मंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयाच्या पाठीमागे हा प्रकार घडला. शकील व्यसनाधीन होता. त्याच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने आठ वर्षांपूर्वी तलाक घेतला होता. तेव्हापासून शकील एक दोन दिवस काम करून नशेखोरी करीत फिरत होता. त्याच्या मृतदेहाजवळ कटर मिळून आले. सीसीटीव्हीतही शकील एकटाच असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच सहायक अधीक्षक दर्शन दुगड, छावणीचे पोलिस निरीक्षक दीपक जाधव व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथक व अन्य सर्व यंत्रणेची मदत घेण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही तपासणी व घटनास्थळी असलेली परिस्थिती बघितल्यानंतर जीवनयात्रा संपवल्याचे निदर्शनास आले. तत्पूर्वी शहरात या घटनेबाबत खून की, जीवनयात्रा संपवली अशी उलटसुलट चर्चा सुरू होती. छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.