Nashik | 'महिंद्रा'ला हवी पाचशे एकर जागा

मंत्रालयात बैठक : आडवणला प्राधान्य, राेजगाराला मिळणार बुस्ट
Nashik Mahindra news
महिंद्रा कंपनीने महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाकडे ५०० एकर जागेची मागणी केली असून, यासंदर्भात नुकतीच मुंबईतील मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.File Photo
Published on
Updated on

नाशिक : नाशिकची महत्त्वाची उद्योगसंस्था असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून नाशिककरांसाठी मोठी आनंदवार्ता मिळणार आहे. कंपनीने महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाकडे ५०० एकर जागेची मागणी केली असून, यासंदर्भात नुकतीच मुंबईतील मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. इगतपुरी तालुक्यातील घोटी आणि आडवण परिसरात ही जागा मिळावी, अशी कंपनीची इच्छा आहे. हा विस्तार प्रकल्प असेल की संपूर्णतः नवा प्रकल्प, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, यामुळे रोजगाराला मोठा बुस्ट मिळणार आहे.

महिंद्र अँड महिंद्रने पुण्यातील चाकण प्रकल्पात इलेक्ट्रिक एसयूव्ही निर्मिती आणि बॅटरी असेंब्लीसाठी १६ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. आता नाशिकमध्येही महिंद्राची मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आनंद महिंद्रा यांची भेट घेतल्यानंतर नाशिकमधील गुंतवणुकीसाठी सकारात्मक संकेत दिले होते. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील सभागृह क्रमांक ३ मध्ये उद्योगमंत्री सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस 'एमआयडीसी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, महिंद्राचे प्रकल्पप्रमुख धनंजय जोशी तसेच कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी व स्थानिक एमआयडीसी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या बैठकीत इगतपुरी तालुक्यातील घोटी आणि आडवण येथे महिंद्राकडून ५०० एकर जागेची मागणी झाली. या ठिकाणी ई-व्हेईकल उत्पादन प्रकल्प उभारण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा अचूक आकडा अद्याप समोर आला नसला तरी, या प्रकल्पामुळे नाशिकमधील रोजगार संधींना मोठा वेग मिळण्याची अपेक्षा आहे.

आडवणला २६२ हेक्टर भूसंपादन

'एमआयडीसी'कडून पाच नवीन औद्योगिक वसाहतींसाठी अडीच हजार एकर जमीन संपादन प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये घोटी, आडवण येथे २६२.९७ हेक्टर (सुमारे ६५७ एकर) जमीन भूसंपादित केली जाणार आहे. यापैकी महिंद्रा कंपनीने ५०० एकर जागेची मागणी केली आहे. याशिवाय, जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही भू-संपादन प्रक्रिया सुरू असून, जांबूटके, दिंडोरी येथे ३१.५१ हेक्टर, मापारवाडी, सिन्नर येथे २३०.६७ हेक्टर, राजूरबहुला, नाशिक येथे १४४.४३ हेक्टर, तसेच मनमाड येथे २६८.८७ हेक्टर जमिनीचे भू-संपादन प्रक्रियेत आहे.

यापूर्वी ७०० कोटींचा विस्तार

नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून उत्पादन दुप्पट करण्यासाठी 'महिंद्रा'ने यापूर्वीच नाशिक प्रकल्पात सुमारे ७०० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करीत, विस्तारीकरण केले आहे. नाशिक प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. यामुळे पूर्वी नाशिक प्रकल्पात दिवसाला साडेतीनशे वाहने तयार केली जात होती. आता हा आकडा पाचशेच्या पुढे गेला असून, त्यात आणखी वाढ करण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news