नाशिक : महायुती जोमात, मविआ कोमात!

मविआचे बडे कारभारी वेगळी वहिवाट चोखाळण्याची शक्यता
महायुती Vs महाआघाडी
महायुती Vs महाआघाडीPudhari News network
Published on
Updated on

नाशिक । मिलिंद सजगुरे

लोकसभा निवडणूकीत सपाटून मार खाल्लेल्या भाजपप्रणित महायुतीला उत्तर महाराष्ट्रात छप्पर फाडके यश मिळाल्याने नेतेमंडळीचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. दुसरीकडे लोकसभा निकालाच्या पुनरावृत्तीची स्वप्ने उराशी बाळगलेल्या महाविकास आघाडी (मविआ ) नेत्यांची अवस्था कोमात गेलेल्या रूग्णाप्रमाणे झाली आहे. महायुतीच्या अभूतपूर्व विजयाचे सत्य हळूहळू स्विकारल्यानंतर मविआचे कारभारी वेगळी वहिवाट चोखाळण्याची शक्यता गडद झाली आहे.

नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगावचा अंतर्भाव असलेल्या उत्तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत महायुतीने जवळपास शत-प्रतिशत यश प्राप्त केले. विभागातील 35 पैकी नवापूरचा अपवाद वगळता अवघ्या जागा खिशात घातल्याने लोकसभा निवडणूकीत वाट्याला आलेले पराभवाचे मळभ दूर झाले. विशेषत:, धुळे आणि नंदुरबार या आदिवासीबहुल जिल्ह्यांत महायुतीने रेकॉर्ड ब्रेक विजयाची नोंद केली. स्वाभाविकपणे आगामी पाच वर्षे तरी महायुतीचे हौसले बुलंद राहणार आहेत. उंबरठ्यावर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांत आताच्या विजयाचे गणित त्यांना नक्कीच बळ देणारे ठरेल. शिवाय, पुन्हा डबल इंजिन सरकार अस्तित्वात आल्याने विकासाला पुरक भूमिका राहण्याचे प्रमेय वेगळा प्रभाव पाडणारे असेल, यामध्ये शंका नाही.

एकीकडे महायुती जोमात असताना मविआची नेतेमंडळी मात्र विधानसभा निकालाने अक्षरश: हादरून गेली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या जळगावमध्ये त्याचे दृश्य परिणाम जाणवत आहेत. मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यातील शीर्षस्थ नेते देवेंद्र फडणवीस यांचे कडवट राजकीय विरोधक एकना‌थ खडसे यांची निकालानंतर भाषा नरमली आहे. त्यांच्यातील नरमाई ते भाजपशी, विशेषत: फडणवीस यांच्याशी पुन्हा जुळवून घेतील, याचे द्योतक मानण्यात येत आहे. 2014 मध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी आपल्याला दिल्लीश्वर पसंती देतील, या खडसे यांच्या विश्वासाला फडणवीस यांची निवड करून मोदी-शाह जोडगोळीने छेद दिला होता. तेव्हापासून भाजपमध्ये असेपर्यंत आणि त्यानंतरही खडसे यांनी फडणवीस यांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली नाही. मध्यंतरी त्यांनी दिल्लीच्या गोटात बस्तान बसवलेले विनोद तावडे यांच्या माध्यमातून भाजपमध्ये पुनश्च हरीओम करण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीस यांच्यासह खडसे यांचे खान्देशातील विरोधक गिरीश महाजन यांच्या प्रखर विरोधानंतर पुनर्प्रवेश प्रक्रिया रखडली. जळगावमधीलच माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांचीही पराभवानंतर अस्वस्थता वाढली असून राष्ट्रवादी अजित पवार गटात येण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत.

नाशिकमध्ये महायुतीत मोठे इन्कमिंग शक्य..

पंधरापैकी चौदा जागा महायुतीने खिशात घातल्यानंतर नाशिक जिल्ह्यातही मविआला नैराश्याने ग्रासले आहे. राजकीय भवितव्यापोटी महायुतीचे घटकपक्ष सोडलेल्या आणि मविआसोबत घरोबा केलेल्या अनेक बड्या प्रस्थांनी आता पुन्हा जुन्या घरी प्रस्थान करण्याची तयारी केली आहे. स्वाभाविकच पांचो उंगलियां घी मध्ये असलेल्या महायुतीमध्ये मोठे इन्कमिंग शक्य आहे. विशेषत:, शिवसेना उबाठासह राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठी अस्वस्थता असल्याची वंदता आहे. या दोन्ही पक्षांतील अस्वस्थ मंडळी महायुतीतील तीनपैकी नेमक्या कोणत्या भिडूला पसंती देतात आणि पक्षप्रवेश करून घेतेसमयी त्यांना पुनर्वसनाबाबत काही आश्वासने मिळतात का, याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news