

नाशिक : विकास गामणे
व्यक्तिकास तसेच सृजनशीलता वाढीस लागण्याचे महत्त्वपूर्ण साधन म्हणजे वाचन! वाचनामुळे आनंद मिळतो. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी त्यांना पुस्तकांकडे आकर्षित करावे आणि लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागामार्फत 'महावाचन उत्सव- २०२४'चे आयोजन केले आहे. या उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील ५ हजार ३२० शाळांमधील ५ लाख २ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध पुस्तकांचे वाचन केले आहे.
मोबाइल फोन, टीव्ही आणि संगणकांच्या वाढत्या वापरामुळे सध्या मुले पुस्तक वाचण्यापासून दूर जात आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना पुन्हा वाचनाची गोडी लावण्यासाठी हा महावाचन उत्सव २० सप्टेंबर २०२४ पासून सुरू आहे. साधारण दर शनिवारी शाळांमध्ये विद्यार्थी दप्तरविना असतात. या दिवशी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर पुस्तके देऊन त्यांचा अभिप्राय घेऊन तो अपलोड केला जातो. जिल्ह्यातील ५ हजार ५६३ शाळांपैकी ५ हजार ३२० शाळांनी (९५.६१ टक्के) नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये एकूण १० लाख ५८ हजार ४०३ विद्यार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत ५ लाख २ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी (४७.५० टक्के) या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांची सर्जनशीलता, भाषा कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास साधणे हे या उत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विशेषत: मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्य, लेखक आणि कवींची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
इयत्ता तिसरी ते बारावी या विद्यार्थ्यांसाठी तीन गट करण्यात आले आहेत (तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी). या गटातील विद्यार्थी त्यांच्या आवडत्या पुस्तकाचे वाचन करून त्यावर लेख लिहित आहेत. तसेच विद्यार्थ्यांना वाचलेल्या पुस्तकावर प्रतिक्रिया देण्यासाठी एक मिनिटाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप अपलोड करत आहेत.
विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाबाबत लिखित स्वरूपात मांडलेल्या विचारांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येऊन प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड तीन गटांसाठी स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. विजयी विद्यार्थ्यांना पुस्तक स्वरूपात पारितोषिक, तर सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात पुस्तक प्रदर्शन आणि मेळावे आयोजित केले जात आहेत. या प्रदर्शनांमध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना नवीन पुस्तके समजावून घेत आहेत.