

त्र्यंबकेश्वर, नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी महाशिवरात्रोत्सवानिमित्त यावर्षी आयोजित केलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या शिवार्पणमस्तु नृत्य कार्यक्रमावरून वादाचे तांडव निर्माण झाले आहे. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी अशा प्रकारे मंदिर प्रांगणात सेलेब्रिटींचे कार्यक्रम करण्याचा पायंडा नको म्हणत या कार्यक्रमाला आक्षेप नोंदवणारे पत्र नाशिक ग्रामीण पोलिसांना दिले. तसेच पुरातत्त्व विभागाने या कार्यक्रमाला आक्षेप घेणारे पत्र देत केंद्रीय कार्यालयाकडून परवानगी घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. परंतु पूर्वनियोजित हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे देवस्थानने जाहीर केले आहे.
बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त लाखो भाविक त्र्यंबकराजाचे दर्शन घेणार आहेत. अशातच त्र्यंबकेश्वर देवस्थानने मराठी अभिनेत्री तथा नृत्यांगणा प्राजक्ता माळी हिचा सांस्कृतिक नृत्याविष्काराचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' हा कार्यक्रम मंदिराच्या प्रांगणात बुधवारी (दि. २६) आयोजित केला आहे. कार्यक्रमाला लाखो लोकांनी उपस्थिती लावल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्य पुरातत्त्व विभागाने विरोध दर्शवित पत्र लिहून कार्यक्रम घेण्यास विरोध दर्शविला आहे. प्राचीन स्मारक आणि पुरातत्त्वीय स्थळ, अवशेष अधिनियम 1958 या कायद्यानुसार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावर अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर मंडल, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांनी आक्षेप घेतला आहे. कार्यक्रमापूर्वी दिल्लीच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयाची परवानगी घेण्याचे आदेश पुरातत्त्व विभागाने दिले आहेत.
मात्र देवस्थानाच्या विश्वस्तांनी सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होतील. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असा ठाम निर्णय घेतला आहे. यामध्ये धार्मिक कार्यक्रमांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. बुधवारी (दि. २६) पालखी दरम्यान शिवतांडव ग्रुपतर्फे अघोर नृत्याचे सादरीकरण, सायंकाळी नटरंग अकॅडमी पुणे प्रस्तुत शिवार्पणमस्तु नृत्याचा कार्यक्रम अभिनेत्री प्राजक्ता माळी व सहकलाकार सादर करणार आहेत. गुरुवारी (दि. २७) ओम नटराज अकॅडमी व दीक्षित यांचे सांस्कृतिक कथक नृत्य सादर होणार असल्याचे विश्वस्त मनोज थेटे यांनी जाहीर केले आहे.
समाज माध्यम आणि वृत्तवाहिन्यांवर या वादाचे पडसाद उमटल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणारा व्हिडिओ अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रसारित केला आहे. त्या मध्ये, नटराज हे भगवान शिवाचे रूप आहे. ते नृत्यकलाकारांचे आराध्य दैवत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा कार्यक्रम हा संपूर्णपणे शास्त्रीय संगीतावर आधारित भरतनाट्यम नृत्यप्रकार आहे. त्यामुळे गैरसमज नको, असे आवाहन तिने केले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात सेलिब्रिटीजच्या नृत्यांचे कार्यक्रम ठेवण्याची परंपरा नाही. यामुळे धार्मिक परंपरांचे पालन होणार नाही. प्राजक्ता माळी नृत्यासाठी आल्यास गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यास पुरातत्त्व विभागानेही विरोध दर्शवला आहे. पोलिस अधीक्षकांनी अशा कार्यक्रमांवर बंदी घालावी.
ललिता शिंदे, माजी विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट
महाशिवरात्रीनिमित्त देवस्थानतर्फे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा 26 फेब्रुवारीला नृत्यांगणा प्राजक्ता माळी हिचा भरतनाट्यम हा कार्यक्रम आयेाजित केला आहे. या कार्यक्रमास पुरातत्त्व विभागही आमच्याबरोबर आहे. मागील वर्षी सारेगमपच्या लिटिल चॅम्प्सला बोलाविण्यात आले होते. यंदा भाविकांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था, गर्दीचे नियंत्रण, बंदोबस्त याचेही नियोजन करण्यात आले आहे.
मनोज थेटे, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर, नाशिक