

नाशिक : जिल्ह्यातील विधानसभेच्या 15 जागांसाठी रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करणे आणि अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर साऱ्यांच्याच नजरा ४ नोव्हेंबरच्या माघारीकडे लागल्या आहेत. प्रमुख उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जासोबत मालमत्तांचे विवरण सादर केले आहे. निवडणुकीत नशीब आजमावणारे बहुतांश उमेदवार हे कोट्यधीश असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
मालेगाव बाह्य मतदारसंघातील शिवसेना उमेदवार तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्या नावे ३ कोटी ४१ लाख ४७ हजार ८२७ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावे ३ कोटी ४९ लाख ३८ हजार २६४ रुपये आहेत. भुसेंकडे सव्वा कोटी व पत्नीच्या नावे सव्वादहा कोटींची स्थावर मालमत्ता आहे. भुसे यांच्या हाती १ लाखाची, तर पत्नीकडे पाच लाखांची रोकड आहे. तसेच भुसे दाम्पत्याकडे बँकेत तीन कोटींहून अधिक रक्कम आहे. भुसे यांच्याकडे सव्वादोन लाख तसेच त्यांच्या पत्नीकडे सव्वापाच लाखांचे सोने आहे. भुसेंवर पावणेदहा लाखांचे, तर त्यांच्या पत्नीवर १५ लाखांचे कर्ज आहे.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांकडे एकूण मालमत्ता ११ कोटी २० लाख रुपयांची असून, त्यांच्यावर २४ लाख ५६ हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे १६ कोटी ५३ लाखांची मालमत्ता असून, त्यांच्या नावावर २१ लाख रुपयांचे कर्ज आहे. जंगम संपत्ती १ कोटी ३२ लाख ६६ हजार २३५ रुपयांची असून, स्थावर संपत्ती ११ कोटी २० लाख ४१ हजार इतकी आहे, तर पत्नीच्या नावे स्थावर संपत्ती १६ कोटी ५३ लाख इतकी आहे. भुजबळ यांच्याकडे एक ट्रॅक्टर असून, त्यांच्या पत्नीच्या नावे टाटा पिकअप वाहन आहे. भुजबळांकडे ५८५ ग्रॅम, तर पत्नी मीना भुजबळ यांच्याकडे ४५५ ग्रॅम सोने तसेच ४ लाख ३७ हजार रुपयांची चांदी आहे. याशिवाय २२ लाख ५ हजारांच्या इतर मौल्यवान वस्तू आहेत. भुजबळांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व सक्त वसुली संचालनालयाने दाखल केलेल्या केसससह एकूण ८ केसेस आहेत.
विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांचे वार्षिक उत्पन्न ३५ लाख ४२ हजार ८०० रुपये असून, त्यांच्या पत्नी चंद्रभागा झिरवाळ यांचे वार्षिक उत्पन्न १४ लाख ८० हजार आहे. झिरवाळ यांची जंगम मालमत्ता ७३ लाख ९४ हजार ३९६ रुपये, तर पत्नीच्या नावे ९ लाख ६१ हजार ३८० रुपांची मालमत्ता आहे. झिरवाळांकडे दोन वाहने असून, स्वतःकडे ३० ग्रॅम सोने आहे. झिरवाळ दाम्पत्याच्या नावे वारसाहक्काने प्राप्त जमीन आहे. झिरवाळांच्या नावे स्थावर मालमत्ता ४५ लाख २५ हजार, तर पत्नीच्या नावे १ कोटी ५५ लाख ७५ हजार रुपयांची मालमत्ता आहे. विविध वित्तीय संस्थांचे ७५ लाख ८५ हजार रुपयांचे कर्ज, तर पत्नीच्या नावे १३ लाख ३७ हजारांचे कर्ज आहे.
नाशिक मध्य मतदारसंघातील प्रा. देवयानी फरांदे यांच्याकडे अडीच लाखांची, तर पती सुहास फरांदेंकडे दोन लाखांची रोकड आहे. देवयानी फरांदे यांच्याकडे १ कोटी ४५ लाखांची, तर पती सुहास यांच्याकडे ४८ लाख ६० हजारांची जंगम मालमत्ता आहे. दाम्पत्याकडे सुमारे ११ कोटींची स्थावर मालमत्ता असून, साधारणत: तीन लाखांचे कर्ज आहे.
नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्याकडे ५ कोटी ९९ लाख १६ हजार, तर पती महेश हिरे यांच्याकडे २२ कोटी २५ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. हिरेंकडे रोख रक्कम ४५ हजार ९०० रुपये असून, पती महेश हिरे यांच्याकडे ५४ हजार रुपयांची रोकड आहे. हिरे दाम्पत्याकडे १६ लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम सोने आहे. आमदार हिरे यांच्याकडील एकूण स्थूल मूल्य ५४ लाख ४० हजार ९२६ रुपये, तर महेश हिरेंकडे एकूण स्थूल मूल्य ९७ लाख ६४ हजार ७५१ रुपये आहे. या दोघांच्या नावे कर्ज नाही.
चांदवड - देवळ्यातून विजयाची हॅट्ट्रिकसाठी निवडणूक रिंगणात उतरलेले डॉ. राहुल आहेर यांच्याकडे ६ कोटी ८० लाखांची, तर पत्नीच्या नावे २ कोटी ४७ लाखांची जंगम मालमत्ता आहे. डॉ. आहेर यांच्याकडे ४ कोटी २३ लाखांची, तर पत्नीकडे ३ कोटी ३४ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. आहेरांकडे १५ लाख ४० हजारांचे, तर पत्नीकडे १६ लाखांचे सोने आहे. स्वत: आहेर यांच्या हाती तीन लाख व त्यांच्या पत्नीकडे ५० हजार रोकड आहे.
सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे ७ कोटी ९२ लाख ८५ हजार १८२ रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडे ९ कोटी ३८ हजार ५२ लाख ६५७ रुपयांची मालमत्ता आहे. कोकाटेंकडे साडेतेरा लाखांची, तर पत्नीकडे साधारणत: १ लाख रुपयांची रोख रक्कम आहे. कोकाटे दाम्पत्याकडे 30 कोटी रुपयांची एकूण स्थावर मालमत्ता असून, त्यांच्यावर सुमारे साडेसात कोटी रुपयांचे कर्ज आहे.
नाशिक पूर्व मतदारसंघामधून दुसऱ्यांदा विधानसभेच्या आखाड्यात उतरलेले ॲड. राहुल ढिकले यांच्याकडे ५८ लाख ७२ हजार व पत्नीकडे १७ लाखांची जंगम मालमत्ता आहे. राहुल यांच्याकडे ७ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम शिल्लक असून, पत्नीकडे ९५ हजार आहेत. राहुल यांची स्थावर मालमत्ता ५ कोटी ८४ लाख १९ हजार रुपयांची असून, त्यांच्या नावे १ कोटी २१ लाख २९ हजारांचे कर्ज आहे. राहुल यांच्याकडे ७ लाख ८० हजार रुपयांचे सोने असून, पत्नीकडे १५ लाख ६० हजार रुपयांचे दागिने आहेत.
इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी प्रतिज्ञापत्रात २५ हजार रोख, तर त्यांच्या पत्नी मैनाबाई खोसकर यांच्याकडे २५ हजार रुपये रोख रक्कम असल्याचे नमूद केले आहे. विविध बॅंकांमध्ये खाती असली, तरी खोसकरांच्या नावे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नाही. खोसकरांकडे एक चारचाकी वाहन असून, स्वत:कडे ३० ग्रॅम व पत्नीकडे २५ ग्रॅम सोने आहे. त्यांची एकूण जंगम मालमत्ता ३४ लाख ९७ हजार १८०, तर पत्नीच्या नावे २ लाख २० हजार ९०० ची मालमत्ता आहे. खोसकरांच्या नावे मौजे नाईकवाडी, मौजे लाडची, येथे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्यांची एकूण स्थावर मालमत्ता २ कोटी ३५ लाख ५५ हजार १९६ रुपये आहे. शेतीसाठी त्यांनी २८ लाख १२ हजारांचे कर्ज घेतले आहे.
कळवणमधून निवडणूक रिंगणात उतरलेले नितीन पवार यांच्याकडे ५ लाखांची, तर पत्नी जयश्री पवार यांच्याकडे ४ लाखांची रोख रक्कम आहे. पवारांकडे स्वतःच्या नावे १ लाख १७ हजार २६५, तर पत्नीच्या नावे १ लाख १८ हजार ८८० रुपयांची विमा पॉलिसी आहे. पवारांकडे २०० ग्रॅम सोने असून, पत्नीच्या नावे ५०० ग्रॅम सोने आहे. पवारांकडे एकूण जंगम मालमत्ता १ कोटी ८५ लाख ३३ हजार ७७३ इतकी असून, पत्नीच्या नावे ५५ लाख ८५ हजार ८२७ इतकी आहे, तर त्यांची जंगम मालमत्ता ८ कोटी २२ लाख ६९ हजार ९५३, तर पत्नीच्या नावे १ कोटी ६९ लाख ८२ हजार ५०० इतकी आहे. आ. पवार यांनी ९० लाख ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यांच्याकडे ५ कोटींची वारस हक्काने प्राप्त झालेली मालमत्ता आहे.
देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दुसऱ्यांंदा नशिक आजमावणाऱ्या सरोज आहिरे दाम्पत्याकडे साधारणत: पावणेतीन कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. आहिरे यांच्या नावे १ कोटी ६४ लाख ३९ हजार व डाॅक्टर पतीच्या नावे १ कोटी १२ लाख ४७ हजारांची जंगम मालमत्ता आहे. आहिरे दाम्पत्याकडे ८८ लाख ९८ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. आहिरेंचे सन २०१९-२० मध्ये २ लाख ९६ हजार रुपये असलेले उत्पन्न २०२३-२४ मध्ये ३९ लाख ८९ हजारांवर पोहोचले आहे. त्यांच्याकडे ४ लाखांची रोकड असून, दोघांच्या बँक खात्यात ५८ लाख ३२ हजारांची रक्कम आहे. दोघांकडे ६९ लाखांचे सोने असून, ४४ लाख ८४ हजारांचे कर्जही आहे.
बागलाण मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेले दिलीप बोरसे यांच्या नावावर अडीच कोटी व पत्नीच्या नावावर ३९ लाखांची जंगम मालमत्ता आहे. बोरसेंकडे १ कोटी १७ लाखांची, तर पत्नीकडे १४ लाख १ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. पत्नीच्या नावे २१ लाखांचे सोन्याचे दागिने असले, तरी यांच्या नावे सोन्याच्या वस्तू नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले आहे. बोरसे दाम्पत्याच्या नावे साडेतीन कोटींचे कर्ज आहे.
निफाडमधून ठाकरे गटाचे उमेदवार असलेले अनिल कदम यांची जंगम मालमत्ता १ कोटी ९७ लाख ५ हजार २४६ इतकी आहे. कदम यांच्याकडे एक दुचाकी व दोन चारचाकी वाहने आहेत. स्वतःकडे ३० ग्रॅम, तर पत्नीकडे २०० ग्रॅम सोने आहे. तसेच त्यांच्याकडे ओझर येथे शेतजमीन आहे. मौजे हतगड येथे संयुक्त मिळकत, गंगापूर रोड येथे वाणिज्य मिळकत, ओझर येथे गाळा, गंगापूर रोड येथे सदनिका, कोथरूड पुणे येथे सदनिका अशी एकूण ८.८८ कोटींची स्थावर मालमत्ता असून, पत्नीच्या नावे ९७.३५ लाखांची स्थावर मिळकत आहे. त्यांच्यावर १.६९ कोटी रुपयांचे कर्ज, तर पत्नीच्या पावे ४८.३५ लाखांचे कर्ज आहे.
नांदगावमधून अपक्ष उमेदवारी करणारे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रतिज्ञापत्रात विविध बँकांमध्ये त्यांच्या नावे ९.४५ आणि पत्नी शेफाली यांच्या नावे खात्यात ३२.१३ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. पत्नीच्या नावे २.५६ कोटींचे, तर समीर यांच्याकडे ३.५४ कोटींचे बाँड्स, समभाग व अन्य गुंतवणूक आहे. या दोघांकडेही ७३ लाखड्परुयांची बचतप्रमाणपत्रे आहेत. समीर भुजबळांच्या नावे १२.६६ कोटी, तर पत्नी शेफाली यांनी ६९.२५ लाखांचे कर्ज घेतले. समीर यांच्याकडे १० तोळे व पत्नीकडे ५० तोळे सोने आहे. समीर भुजबळांकडे द्राक्षबाग असून, त्याचे मूल्य २०.९० लाख रुपये आहे. शहरात ४.५६ कोटींचे मूल्यांकन असलेली एक एकर जमीन व विविध ठिकाणी मालमत्ता आहे. विविध संस्था व बँकांची १५.४७ कोटी रुपयांची देणी आहेत. त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाचा खटला प्रलंबित असून, या विभागाकडे २७.३१ लाख रुपये अनामत जमा आहे. विविध प्रकारचे ८ गुन्हे दाखल असून, ते सर्व न्यायप्रविष्ट आहेत.
सिन्नरचे शरद पवार गटाचे उमेदवार उदय सांगळे यांचे वार्षिक उत्पन्न ५१ लाख ८१ हजार रूपये असून, त्यांच्या पत्नीचे उत्पन्न ६ लाख ४ हजार इतके आहे. सांगळे यांच्याकडे २ लाख ९९ हजार रोख व त्यांच्या पत्नीकडे ८ हजार रुपये रोख रक्कम आहे. उदय सांगळे यांच्याकडे २ तोळे सोने असून, पत्नीकडे ५० तोळे सोने आहे. त्यांची एकूण जंगम मालमत्ता २ कोटी २३ लाख २४ हजार इतकी असून, पत्नीच्या नावे ८४ लाख ६७ हजार ४१० इतकी मालमत्ता आहे. सांगळे यांच्या नावे सिन्नर, नाशिक, पुण्यातील कोथरूड येथे मालमत्ता आहेत. त्यांची एकूण जंगम मालमत्ता २८ कोटी १५ लाख ३७ हजार २२ इतकी असून, पत्नीच्या नावे ६८ लाख ३५ हजार ७८० रुपये किमतीची मालमत्ता आहे. त्यांच्या नावे कोटक बँक आणि अॅक्सिस बँकेचे एकूण सुमारे ७४ लाख रुपयांचे कर्ज आहे.
----
निफाडचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार गुरुदेव कांदे यांचे वार्षिक उत्पन्न ७ लाख २५ हजार २८ इतके आहे. त्यांच्याकडे १५ लाख १२ हजार ४३१ रुपयांची जंगम मालमत्ता असून, पत्नी प्रतिभा कांदे यांच्या नावे १ लाख ६७ हजार २०९ रुपये किमतीची मालमत्ता आहे. कांदे यांच्याकडे ६३.७९ ग्रॅम, तर पत्नीकडे १७.६९ ग्रॅम सोने आहे. तसेच मौजे करंजी येथे १७ गुंठे शेतजमीन, सिन्नर, सायखेडा येथे जमीन असून, पत्नीच्या नावे नाशिक येथे फ्लॅट आहे. त्यांची एकूण स्थावर मालमत्ता ५० लाख ८५ हजार इतकी असून, पत्नीच्या नावे ३८ लाख २८ हजार ११८ रुपये मालमत्ता आहे. विविध बँकांचे २९ लाख ३१ हजार रुपये कर्ज असून, पत्नीच्या नावे १३ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज आहे.