

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : परिसरातील लष्करी भागात दोन बिबट्यांच्या झुंजीत एक बिबट्या दगावला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. देवळाली कॅम्प, भगूरसह परिसरातील लहवित, बार्न्स स्कूल रस्ता, राहुरी, दोनवाडे, संसरी, नानेगाव, पळसे, मोहगाव, बाभळेश्वर, बेलतगव्हाण, विहितगाव, वडनेर दुमाला या पट्ट्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, अनेक बिबटे जेरबंदही करण्यात आले आहेत. तरीदेखील बिबट्यांचा वावर कमी होताना दिसत नाही.
दारणा काठासह मळे भागात बिबट्यांचे वास्तव्य अनेक वेळा सिद्ध झाले असून, शुक्रवारी (दि. २४) सकाळच्या सुमाराला लष्कराच्या देवळाली कॅम्प येथील धोंडी रोड मार्गावर बिबट्या मृतावस्थेत आढळला. वनविभागाचे अधिकारी सुमित निर्मळ, विजयसिंह पाटील, राजेंद्र ठाकरे, सोमनाथ निंबेकार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन बिबट्यांच्या झुंजीत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.