

देवळा ; देवळा तालुक्यातील दहिवड येथील भवरी शिवारातील भाऊसाहेब खंडू सोनवणे यांच्या गट नंबर 66/ 3 मधील घरा शेजारील शेताच्या खळ्यातील जाळीत बंदिस्त असलेल्या शेळ्यांवर मंगळवारी दि. ३१ रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून, त्यात दोन शेळ्या, एक वासरू जागीच ठार झाले आहे. तर एक बोकड घेऊन बिबट्याने पलायन केले असल्याचे समजते.
पहाटे घराजवळ कसला तरी आवाज येत असल्याचे समजताच शेतकरी भाऊसाहेब सोनवणे यांना जाग आली असता ते बाहेर आल्याने जाळीच्या आत बंदिस्त असलेल्या शेळ्यांचा फडशा पडलेला दिसून आला, तर सकाळी बाजुच्या शेतात वन्य प्राण्याचे ठसे उमटल्याचे दिसून आल्याने हा हल्ला बिबट्यानेच केल्याची खात्री झाली आहे .
सदर बिबट्याच्या ह्या हल्ल्यात दोन शेळ्या व एक वासरू जागीच ठार झाले आहे. तर एक बोकड घेऊन बिबट्याने धूम ठोकली. बाहेर शेळ्याचा आवाज आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन वनपरिक्षेत्र अधिकारी देवीदास चौधरी, वनपाल जि.जि.पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मृत शेळ्यांचा पंचनामा केला आहे. या शिवारात बिबट्याची दहशत पसरली असून वारंवार पशुधनावर हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वन विभागाने याठिकाणी पिंजरा बसवावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी भवरी शिवारातील भाऊसाहेब सोनवणे, दिलीप सोनवणे, शिवाजी सोनजे, देविदास सोनवणे, राजेंद्र सोनवणे आदी शेतकरी व शेतमजुरांनी केली आहे.