

नाशिक : नाशिक रोड परिसरातील विहितगाव, हांडोरे मळ्यात एका चारवर्षीय चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केला. यात चिुमरडा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते, नंतर त्यास खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. गुरुवारी (दि.२६) सायंकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
विहितगाव परिसरात बिबट्यांचा मुक्त वावर रहिवाशांमध्ये दहशत निर्माण करणारा ठरत आहे. यापूर्वी देखील या भागात लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान, ऋषिकेश प्रकाश छंद्रे हा चार वर्षाचा चिमुरडा घराबाहेर खेळत असताना, अचानकच बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. बिबट्याने त्याच्या मानेवर, डोक्यावर तसेच चेहऱ्यावर पंजा मारत नखांनी गंभीर जखमी केले. तसेच त्याला फरपटत नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब त्याच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी आरडाओरडा करीत, बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळे बिथरलेल्या बिबट्याने ऋषिकेशला सोडत धूम ठोकली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करीत, बिबट्याचा शोध घेण्यास सांगितले. दरम्यान, ऋषिकेश गंभीर जखमी असल्याने, बिटको रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविले. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
मळे परिसर असलेल्या या भागात बिबट्यांचा नेहमीच मुक्त वावर राहिला आहे. यापूर्वीदेखील अनेकदा बिबट्यांनी लहानग्यांवर हल्ले केले आहेत. या भागात बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वेळोवेळी वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले आहेत. मात्र, अशातही बिबट्यांचा मुक्त वावर सुरू असल्याने, लहानगे बिबट्यांचा शिकार ठरत आहेत. वनविभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवून हा परिसर बिबटे मुक्त करावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.