नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकातील फुले दाम्पत्याच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे शनिवारी (दि. २८) दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादा भुसे व ग्रामविकास, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्त्री शिक्षणाचे जनक अन् थोर समाजसुधारक फुले दाम्पत्याचे विशेष कार्य संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवून ते रुजविण्यासाठी मंत्री भुजबळ यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभारण्यात आले आहे. त्यासाठी भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने नाशिक महापालिकेकडे पाठपुरावा केला. या सोहळ्यास खा. राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजित तांबे, किशोर दराडे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल ढिकले, सरोज अहिरे, माजी आमदार पंकज भुजबळ, वसंत गिते आदी उपस्थित राहणार आहेत.