

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याला येणार्या भाविकांची संख्या लक्षात घेता भाविकांना वाहतुककोंडीचा सामना करावा लागु नये, यासाठी नाशिक शहर, जिल्ह्यातील वाहनतळांच्या क्षमतेचा आढावा अत्याधुनिक कॅमेर्यांचा वापर, साधुग्रामसाठी जमिन अधिग्रहण, मानुरच्या दिशेने जागा अधिग्रहित करण्यासाठी नियोजन, पार्किंगस्थळे, शहर, जिल्ह्यातील रस्त्यांची बांधणीसह आवश्यक सोईसुविधा अन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आराखडा तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी दिल्या आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा -2027 च्या तयारीसाठी जिल्हाधिकार्यांकडून दर मंगळवारी घेण्यात येतो. मंगळवारी (दि17) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेली बैठक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व स्मिता झगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर आदी उपस्थित होते.
कुंभमेळाच्या तयारीसाठी नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे वाहतुक व्यवस्थापन आणि पार्किंग सुविधांसाठी नियोजन सुरु केले आहे. याअंतर्गत शहराच्या बाहेरुन येणार्या वाहनांना शहरात प्रवेश न देता नियोजित वाहनतळांवर वाहने पार्किंग करता येतील यासाठी महापालिकेने हद्दीत 22 ठिकाणी वाहनतळ प्रस्तावित केले आहे. यामध्ये पेठरोड, दिंडोरी रोड, धुळेरोड, पुणेरोड, गंगापूररोड, त्र्यंबकरोड, मुंबईरोड, संभाजीनगर रोड आदी ठिकाणी वाहनतळांची उभारणी प्रस्तावित आहे.
नाशिक जिल्ह्याला जोडणार्या नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई, नाशिक-औरंगाबाद, नाशिक-धुळे या महामार्गांना जोडणार्या राज्यमार्गावर बाह्य रिंगरोड तयार करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाला नुकसाच सादर करण्यात आला. या बाह्य रिंगरोडवर वाहनतळांची उभारणी करण्यासाठी बांधकाम विभागाकडून सर्वे सुरु करण्यात आला आहे. सर्वे पुर्ण होताच वाहनतळांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. 2015-16 च्या कुंंभमेळ्यात पेठरोड, गंगापूररोड, खंबाळे, राजुरबहुला, शिलापूर, मोहशिवार, दिंडोरीरोड आदी ठिकाणी वाहनतळांची उभारणी करण्यात आली होती. याचाही अभ्यास बांधकाम विभागाकडून सुरु आहे.