Nashik Kumbh Mela | सिंहस्थ कामांसाठी आज मेगा दौरा
नाशिक : सिंहस्थ कामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या नियोजित बैठकीपूर्वी नाशिकमध्ये सिंहस्थ कामांच्या पूर्वतयारीला वेग आला आहे.
गुरुवार (दि. १३) पासून दोन दिवस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह विविध विभागांचे तब्बल ५० प्रमुख अधिकारी प्रस्तावित सिंहस्थ कामांचा स्थळपाहणी दौरा करणार आहेत. यात त्र्यंबकेश्वर व नाशिकमधील कामांचा आढावा घेतला जाणार असून, शाहीमार्ग, नदीकाठावरील घाट, रामकाल पथ, रामकुंड, साधुग्राम, पार्किंगसह अतिक्रमित ठिकाणे, रिंग रोड आदींची जागेवर जाऊन माहिती घेतली जाणार आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी नियोजन सुरू केले असून, महापालिकेने ७,७६७ कोटींचा आराखडा तयार केला आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम, पोलिस विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा आणि नाशिक विकास प्राधिकरणासह विविध विभागांनी मिळून एकूण साडेसात हजार कोटींचे नियोजन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकचा कुंभमेळा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून तयारी सुरू आहे.
चेंगराचेंगरीचा धसका
२००३ मध्ये नाशिकमध्ये आणि आताच्या प्रयागराज कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. दुर्घटनामुक्त कुंभमेळ्यासाठी विशेष उपाययोजना आखल्या जात असून, त्याअंतर्गत अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात त्र्यंबकेश्वरचा पाहणी दौरा केला. पुढील नियोजनानुसार गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत नाशिकमधील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे.
या ठिकाणांवर लक्ष केंद्रित
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ उच्चस्तरीय समितीची बैठक होत आहे. या बैठकीची निश्चित तारीख ठरली नसली तरी सिंहस्थकामांचे सादरीकरण या बैठकीत करावे लागणार आहे. त्यादृष्टीने शाहीमार्ग, रामकुंड, काळाराम मंदिर परिसर, पंचवटीतील रामकाल पथ, तपोवनातील आखाडे, साधुग्रामची जागा, नदीकाठावरील घाट, सिंहस्थासाठीचे पार्किंग, रिंग रोड, नाशिकमध्ये प्रवेश करणारे प्रमुख रस्ते यासह विविध ठिकाणांना भेटी देऊन अधिकारी त्याचा अभ्यास करणार आहेत.

